

पाटणूस: देवकुंड धबधब्यात रविवारी दुपारी दोन वाजता बुडालेल्या गोपाळ रामलाल राठोड (वय-२२,रा. दामला तांडा ता. मुखेड, जिल्हा नांदेड) व विष्णू विलास ढोक (वय-२३.रा. जयपूर ता. शेणगाव , हिंगोली) या दोन पर्यटकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आज यश आले आहे.
स्थानिक तरुण, बचाव पथके यांच्या मदतीने पोलिसांनी आज सकाळपासून शोध मोहीम राबवून २४ तासानंतर या बुडालेल्या दोन युवकांचे मृतदेह बाहेर काढले. पाटणूस हद्दीतील देवकुंड धबधबा पहाण्यासाठी रविवारी टेम्पो ट्रॅव्हल बस मध्ये २० पर्यटक आले होते.
मात्र पाटणूस एस टी स्टॅन्डवर माणगाव पोलिसांनी त्यांना अडविले होते, मात्र पोलिसांना गुंगारा देत हे पर्यटक स्थानिक आदिवासी गाईडच्या मदतीने दुसऱ्या मार्गाने देवकुंडला पोहचले. देवकुंडला पोहचल्यावर धबधब्यात काही पर्यटक उतरले परंतु पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या पैकी दोन पर्यटक गोपाळ राठोड व विष्णू ढोक हे खोल पाण्यात बुडाले होते.
घटना समजताच स्थानिक गाईड, शेलार मामा रेस्क्यू, टीम सागर रेस्क्यू टीम, ग्रामस्थ, पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी पोहोचले. परंतु अंधार झाल्यामुळे शोध मोहीम थांबविण्यात आली.
सोमवारी सकाळी ७ वाजता माणगाव उप विभागीय पोलिस अधिकारी आर.के. पवार, पो.नि. संजय बांगर , उप निरिक्षक किरवले, प्रणव लांडे, तांदळे, कैलास पवार, सानप आदीं सोबत आरसीपीचे ६ पोलीस जवान, तसेच शेलार मामा रेस्क्यू टीम व त्यांचे सहकारी प्रशांत शेलार, प्रकाश झोरे, संतोष बांदल, राहुल गुजर, करण म्हामुणकर, अर्जुन म्हामुणकर, अक्षय गुजर, अक्षय झोरे, विठ्ठल जाधव, नितीन मेंगड, नवलेश शेलार, सुनिल शेलार आदिंनी अथक परिश्रम घेतले.