Matheran E Toilet Scam pudhari photo
रायगड

Matheran E Toilet Scam : ई-शौचालय खरेदीत 38 लाखांचा घोटाळा

माथेरानमध्ये पर्यटकांसाठी उभारण्यात आलेली अद्ययावत सुविधा; सार्वजनिक निधीचा अपव्यय?

पुढारी वृत्तसेवा

नेरळ : आनंद सकपाळ

माथेरान नगरपरिषदेत ई-शौचालय खरेदी प्रक्रियेत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पर्यटकांच्या सुविधांसाठी उभारण्यात आलेल्या ई-शौचालयांच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आला असून या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.

पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. पर्यटकांना स्वच्छ, सुरक्षित आणि मोफत शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपरिषदेकडून ई-शौचालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता या प्रकल्पाच्या खर्चावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सामाजिक कार्यकर्ते दिगंबर चंदने यांनी केलेल्या आरोपानुसार, दोन सीटच्या एका ई-शौचालयासाठी तब्बल ३८ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. तसेच संबंधित ठेकेदाराला एवढ्या मोठ्या रकमेचे बिल अदा करण्यात आल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.

यापूर्वी विरोधी पक्षाचे नगरसेवक सीताराम कुंभार आणि सचिन दाभेकर यांनी तत्कालीन मुख्याधिकारी विजय सूर्यवंशी यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार केली होती. मात्र अद्याप कोणतीही ठोस चौकशी झालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या प्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दोन सीटच्या ई-शौचालयाची किंमत एवढी असू शकते का? खरेदी प्रक्रियेत शासनाच्या नियमांचे पालन करण्यात आले का? निविदा प्रक्रिया पारदर्शक होती का? सार्वजनिक निधीचा अपव्यय झाला का? अशा विविध मुद्द्यांवर नागरिकांकडून शंका व्यक्त करण्यात येत आहेत.

संपूर्ण व्यवहाराची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करून सत्य समोर आणावे तसेच दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, ई-शौचालय खरेदीचा हा व्यवहार खरोखरच नियमबाह्य होता की सर्व प्रक्रिया नियमानुसार पार पडली होती, याचे उत्तर चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र सध्या तरी ३८ लाख रुपयांच्या ई-शौचालयाची चर्चा संपूर्ण माथेरानमध्ये रंगली आहे.

नगरपरिषद प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

ई-शौचालय खरेदीचा हा व्यवहार खरोखरच नियमबाह्य होता की सर्व प्रक्रिया नियमानुसार पार पडली होती, याचे उत्तर चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र सध्या तरी ३८ लाख रुपयांच्या ई-शौचालयाची चर्चा संपूर्ण माथेरानमध्ये रंगली असून नगरपरिषद प्रशासन आणि संबंधित यंत्रणा याबाबत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT