अलिबाग : अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 7 गट आणि 14 गण यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अलिबाग तालुक्यात निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूकीत 2 लाख 1 हजार 923 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून पुरूष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक असल्याचे माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी यासंदर्भातील माहिती दिली.
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 1 जुलै 2025 रोजीची मतदार यादी या निवडणूकीसाठी अंतिम असणार आहे. अलिबाग तालुक्यात 1 लाख 3 हजार 117 महिला मतदार असून पुरूष मतदारांची संख्या 98 हजार 806 इतकी आहे. पुरूषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक आहे. अलिबाग तालुक्यात 261 मतदान केंद्र असणार आहेत, त्यात एक महिला साठी मतदान केंद्र असेल. मतदानासाठी 287 मतदान कंट्रोल युनिट व 574 बॅलेट युनिट अधिग्रहीत करण्यात आली आहेत.
अलिबाग तालुक्यात समान नावांची नोंद असलेले 9 हजार 997 संभाव्य दुबार मतदार आढळले आहेत. तर छायाचित्र समान असलेल्या मतदारांची पडताळणी केली असता या 9 हजार 997 मतदारांपैकी 2 हजार 282 मतदार दुबार आढळून आले आहेत. आयोगाकडील सूचनांनुसार या मतदारांकडून जोडपत्र 1 भरून घेण्यात आलेले आहे. त्यांनी कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार हे लिहून दिलेले आहे.
जिल्हा परिषद गटनिहाय आरक्षण (7)
शहापूर- सर्वसाधारण,
आंबेपूर- सर्वसाधारण स्त्री,
आवास- सर्वसाधारण,
थळ- सर्वसाधारण स्त्री,
चेंढरे- नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला),
चौल- सर्वसाधारण,
काविर- नागरीकांचा मागास प्रवर्ग.
पंचायत समिती गणनिहाय आरक्षण (14)
सर्वसाधारण- वैजाळी, शहापूर, आंबेपूर, आक्षी, काविर.
सर्वसाधारण स्त्री- किहीम, चेंढरे, चौल, रामराज.
नागरीकांचा मागास प्रवर्ग- रेवदंडा.
नागरीकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)- आवास, वरसोली.
अनुसूचित जमाती- रूईशेत भोमोली.
अनुसूचित जमाती (स्त्री)- थळ.