अलिबागः अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्याविरोधात माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चुकीचे व अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार संताप व्यक्त केला. या निषेध आंदोलनात दानवे यांच्या पुतळ्याला चपला घालत मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर पुतळा पेटवून जाहीर निषेध नोंदवण्यात आला.
निदर्शनावेळी जिल्हाप्रमुख राजा केणी, कामगार नेते दीपक रानवडे, मानसी दळवी, संजीवनी नाईक, उपजिल्हाप्रमुख शैलेश चव्हाण, महिला आघाडीच्या विधानसभा अध्यक्ष तनुजा मोरे, भगीरथ पाटील, स्वप्निल पाटील, तसेच अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
आंदोलनकर्त्यांनी सांगितले की “आमदार महेंद्र दळवी यांचा अपमान करणाऱ्याला शिवसेना कधीच सोडणार नाही. दानवेंनी केलेल्या खोट्या आरोपांवर कायदेशीर कारवाई व्हावी.,अशी मागणी यावेळी करण्यात आली. अशा प्रकारची अपशब्दांची भाषा वा चुकीची माहिती प्रसारित करणाऱ्यांवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येईल,असाइशाराही देण्यात आला.
जोरदार घोषणाबाजी
अलिबाग येथील शिवाजी महाराज चौकात शेकडो शिवसैनिकांनी . “अंबादास दानवे मुर्दाबाद”, “महेंद्र शेठ दळवी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं” अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला. महेंद्र दळवी यांच्याविषयी खोटी माहिती पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. दानवे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला चपलांनी मारहाण करत संताप व्यक्त केला. त्यानंतर पुतळा जाळून दानवे यांच्या ‘पाखंडी’ वागणुकीला तीव्र विरोध दर्शवण्यात आला. या कृतीमुळे चौकात काही वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.