

रायगड ः जयंत धुळप
अलिबाग जवळच्या नागाव गावांतील वाळंज पारोडा खालच्या आळीत भर वस्तीत नारळाच्या वाडीत बिबट्याने येवून मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अमीत वतर्क आणि प्रसाद सुतार या दोघांवर हल्ला केला. यामध्ये अमीत वर्तक गंभीर जखमी झाले तर प्रसाद सुतार अल्प प्रमाणात जखमी झाले.
वन विभागाच्या रस्क्यू टिमला संध्याकाळी डार्ट इंजेक्शन गन तंत्रज्ञानाचा वापर करुन, प्रेशनगनने गुंगीचे इंजेक्शन बिबट्याला मारण्यात आले आहे. ते त्याला लागले आहे का याची खातरजमा करण्यात येत असून त्याच शोध थर्मल ड्रोनच्या माध्यमातून घेण्यात येत असल्याची माहिती अलिबाग वन विभागाचे उप वन संरक्षक राहूल पाटील यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली आहे. यामुळे गांव भितीच्या सावटाखाली आहे.
अलिबाग जवळच्या नागाव गावांतील वाळंज पारोडा खालच्या आळीत भर वस्तीत नारळाच्या वाडीत बिबट्या दिसला. लागलीच साऱ्यांची धावाधाव झाली. पूणे येथील वन विभागीची विशेष रेस्कू टिम दाखल झाल्यावर बिबट्याला डार्ट इंजेक्शन गनचा वापर करुन बेशुद्ध करण्याचे तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेण्यात आला.
डार्ट इंजेक्शन गन तंत्रज्ञान म्हणजे प्रेशरगनच्या माध्यमातून प्राण्यांना बेशुद्ध करण्याकरिता वापरण्यात येणारे इंजेकशन प्रेशनगनने त्या बिबळ्याच्या मांसल शरिरावर फायर करण्यात येते. ते इंजेक्शन बिबळ्याला लागल्यावर बिबळ्या पूढील 10 मिनिटात बेशुद्ध होतो. आणि मग त्यास तत्काळ उचलून रेस्क्यू पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात येत. सुमारे 30 मिनीटांनी बिबट्या पूर्ववत शुद्धीवर येतो. पंरतू हा बिबट्या सतत चंचलतेने पळत होता. मात्र अखेर संध्याकाळी त्यास इंजेक्शन फायर करण्यात आले असून बिबट्या त्यानंतर पळाला आहे. हे इंजेक्शन त्यास लागले आहे की नाही याची खातरजमा करण्यात येत आहे. मात्र सुर्यास्तानंतर हे करणे काहीसे अवघड आहे. जर इंजेक्शन योग्य प्रकारे लागले असेल तर तो बिबट्या बेशुद्ध अवस्थेत सापडून येईल. त्याचाच शोध रस्क्यू टिम थर्मल ड्रोणच्या माध्यमातून घेत असल्याचे उप वन संरक्षक राहूल पाटील यांनी पूढे सांगीतले. परिणामी आजची रात्र नागावकरांना बिबट्याच्या दहशतीच्या भीतीखाली रात्र जागूनच काढावी लागणार आहे.
दरम्यान मंगळवारी सकाळी बिबट्याने ग्रामस्थांवर हल्ला केल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या रोहा व अलिबाग येथील टिम, अलिबाग व रेवदंडा पोलीस, रायगड पोलीसांची क्विक रिस्पॉन्स टिम तत्काळ घटनास्थळी पोहोचल्या. त्याच वेळी पुणे येथील वन विभागाच्या विशेष रेस्क्यू टिमला देखील पाचारण करण्यात आले. नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्याकडून बिबट्याच्या ठावठिकाण्या बाबत माहिती घेवून त्यांच्या त्यांचा माग काढण्यास प्रारंभ केला. हा बिबट्या एका वाडीतून दुसऱ्या वाडीत, एका बिल्डिंगच्या टेरेस वरुन दुसऱ्या बिल्डींगच्या टेरेसवर अत्यंत चपळाईने उड्या मारुन सतत हुलकावण्या देत होता.त्यांच वेळी एका इमारतीवर उडी मारताना हा बिबट्या त्यांची उडी चुकल्याने सुमारे विस फूट खाली कोसळला आणि त्यांस मार लागल्याने तो काहीसा चवताळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगीतले. परिणामी बिबट्यावर जाळे टाकून त्यांस जेरबंद करणे केवळ अशक्य झाले.
नागाव येथील शाळेतील सकाळच्या सत्रातील एकुण 250 विद्यार्थी सकाळी शाळेत पोहोचले. प्रार्थना होवू वर्गात बसले आणि बिबट्याच्या हल्ल्याची बातमी आली. आणि शाळेतील सर्व विद्यार्थी आणि घरोघर असलेले त्यांचे पालक पूर्णपणे घाबरुन गेले होते. दरम्यान अलिबाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक किशोर साळे यांनी आपल्या टिमसह नागाव मध्ये पोहोचून सर्वाना सतर्क केले आणि सुरक्षेबाबत विश्वास दिला. दरम्यान नागाव मधून जाणारी अलिबाग-रेवदंडा ही वाहतूक देखील बंद करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका भावेश्री वाळंज आणि शिक्षक वर्गाने सर्व विद्यार्थ्यांना शाळेतच सुखरुप ठेवले.
पालकांना संपर्क करुन दुपारी हे सर्व विद्यार्थी आपापल्या पालकां बरोबर आपापल्या घरी सुखरुप पोहोचले असल्याची माहिती नागाव हायस्कूलच्या मुख्याध्यापीका भावेश्री वाळंज यांनी दिली. जो पर्यंत बिबळ्याचा बंदोबस्त होत नाही तो पर्यंत पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नये, असा निर्णय शाळा व्यवस्थापनाने घेतला आहे.बिबट्याने सकाळी हल्ला केल्याचे लक्षात येताच नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर यांनी सत्वर वन विभागा आणि पोलीसांना कळवून, स्वतः आपल्या सहकार्यासह गावांत फिरुन ग्रामस्थाना घरा बाहेर न पडण्याचे आवाहन करुन सतर्क केले. जखमी ग्रामस्थांना देखील तत्काळ रुग्णालयात नेण्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करण्यात आली.
बिबट्यांच्या नसबंदी सहा महिन्यात, हल्ले रोखण्यासाठी एक कोटीचे बकरे जंगलात सोडा ; विधानसभेत वनमंत्र्यांची फटकेबाजी
अलिबाग जवळच्या नागावमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात पाच जण जखमी झाल्याची आजची घटना एका बाजूला तर विधानसभेत वन मंत्री गणेश नाईक यांनी बिबट्यांची नसबंदीची सहामहिन्यात कायर्वाही करण्याचे सांगताना जर हल्ले तातडीने रोखायचेे असेल तर एक कोटीचे बकरे जंगलात सोडा, असा अफलातून सल्लाही दिला. बिबट्याच्या हल्ल्यातील मनुष्यहानी टाळायची असेल तर जंगलात बकरे सोडले पाहीजेत. आपण मनुष्य दगावला तर एक कोटी भरपाई देतो, पण यात माणसाचा जीव जातो. जीव वाचवण्यसाठी हेच एक कोटी बकरे खरेदीसाठी वापरुन जंगलात बकरे सोडता येतील, असेही नाईक यांनी आवर्जून सांगीतले. विधानसभेत बिबट्यांच्या प्रश्नावर बोलताना हे उपाय त्यांनी सुचवले आहेत.