जयंत धुळप
रायगड: अलिबागच्या सन्मित्र गणेशोत्सव मंडळाकडून ६५ वर्षांची हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा कायम राखली आहे. येथील मानाच्या मानल्या जाणाऱ्या सन्मित्र गणेशोत्सव मंडळ, बाजारपेठ या मंडळाचे पहिले अध्यक्ष पापाभाई पठाण हे होते, ज्यामुळे या गणेशोत्सवाला सुरुवातीपासूनच हिंदू-मुस्लिम अनोख्या ऐक्याची एक भक्कम पार्श्वभूमी लाभली आहे.
आज ६५ वर्षे पूर्ण झाली तरीही ही धार्मिक सलोख्याची आणि सामाजिक ऐक्याची परंपरा अविरतपणे जपली गेली आहे.
या उत्सवात आजही सर्वधर्मीय व्यावसायिक आणि नागरिक तितक्याच उत्साहाने सहभागी होत असून हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा गेली ६५ वर्षे अबाधित असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष अश्विन लालन यांनी दिली आहे.
गेल्या दहा वर्षांपूर्वी पीओपी गणेशमुर्तींचा मुद्दा ऐरणीवर आल्यावर, पर्यावरणस्नेही कायमस्वरुपी फायबरची गणेशमुर्ती करुन त्याची स्थापना करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आणि या निमित्ताने पर्यावरणस्नेही सार्वजनिक गणेशोत्वाची मुहूर्तमेढ देखील याच गणेशोत्सव मंडळाने रोवून समाजापूढे आगळा आदर्श ठेवला आहे.
या गणेशोत्सवात धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारी भजन परंपरा देखील आजवर तितक्याच श्रद्धेने अबाधित राखण्यात आली आहे. केवळ उत्सव साजरा न करता सामाजिक भान जपणाऱ्या या मंडळाकडून यंदा आय चेकअप कॅम्प, मुख्यमंत्री हेल्थ चेकअप कॅम्प आणि जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून नागरिकांची आरोग्य तपासणी यांसारखे विविध लोकोपयोगी उपक्रम राबवले जाणार असल्याचे अध्यक्ष अश्विन लालन यांनी सांगीतले.
गेल्या साडेसहा दशकांपासून अलिबागच्या मुख्य बाजारपेठेत साजरा होणारा हा उत्सव सामाजिक बांधिलकीचे एक उत्तम प्रतीक बनला आहे. देखणी गणेशमूर्ती, नयनरम्य देखावे आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघणारी भव्य विसर्जन मिरवणूक यांमुळे या मंडळाने ६५ वर्षांच्या प्रवासात अलिबागच्या सांस्कृतिक पटलावर आपले एक अत्यंत आदराचे व विशेष स्थान निर्माण केले आहे. दरम्यान, आज पर्यावरण रक्षणासाठी सर्वच स्थरावर प्रयत्न होतान दिसत असून सन्मित्रचे योगदान महत्वाचे आहे.