

मंगेश जाधव
घाटकोपर: घाटकोपर पश्चिम अखिल भटवाडी सार्वजनिक उत्सव मंडळाने शाडूच्या मातीपासून ८ फूट उंच गणेशमुर्ती साकारली असून यावर्षी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आधारित अनोखा देखावाही सादर केला आहे. गणेशोत्सवातील जिवंत देखावे, चलचित्रे आणि समाजप्रबोधनात्मक सजावटींची परंपरा मंडळाने यंदाही कायम ठेवली आहे.
मंडळाचे हे ५८ वे वर्ष असून मंडळाने गणेशोत्सवाच्या माध्यमातून सजावट आणि चलचित्रचा व्यापक स्वरूपात वापर करून समाज प्रबोधनाची परंपरा कायम ठेवली आहे.
मंडळाने यापूर्वी स्वातंत्र्य मुक्तीसाठी दिलेले बलिदान, व्यसनमुक्तीवर आधारित चलचित्र देखावा तसेच गेल्या वर्षी स्वामी समर्थांच्या प्रकट होण्याबाबतचा सजीव देखावा साकारला होता.
यावर्षी विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता यावर दिखावा सादर करत त्याचा मानवी जीवनासाठी प्रभावी सकारात्मक आणि नकारात्मक वापर कसा करता येईल याबाबतचा देखावा सादर केला आहे.
या सजावटीत श्रीकृष्ण-अर्जुन संवादातून मिळणारा विवेकाचा संदेश, लोकमान्य टिळकांनी १८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाला दिलेले सामाजिक स्वरूप, स्वातंत्र्यलढा, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे योगदान, इस्रोची अंतराळ संशोधनातील झेप, डिजिटल इंडिया, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा विविध टप्प्यांतून भारताच्या बुद्धिमत्ता आणि वैज्ञानिक प्रगतीचा प्रवास मांडण्यात आला आहे.
भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेपासून आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंतचा प्रवास या सजावटीच्या माध्यमातून प्रभावीपणे उलगडण्यात आल्याची माहिती अध्यक्ष मंगेश परब व कार्याध्यक्ष निलेश मिरगुले यांनी दिली.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी मंडळाने संपूर्ण सजावटीसाठी प्रामुख्याने कागद, पुठ्ठा, लाकूड आणि कापड यासारख्या पर्यावरण पूरक साहित्याचा वापर केला आहे. देखाव्यातील विशेष आकर्षण म्हणजे पुठ्ठ्यापासून साकारलेले थ्री डी रॉकेटचे उड्डाण, बुलेट ट्रेन, अंतराळ संशोधन यासह तंत्रज्ञानाच्या प्रगती सोबत पर्यावरणाची जबाबदारी यावेळी अधोरेखित करण्यात आली आहे.
असा साकारला देखावा
सजावट संकल्पना मंडळाचे कार्याध्यक्ष निलेश मिरगुले यांची असून कला दिग्दर्शक अतुल खुळे आणि सह कलादिग्दर्शक अभिषेक घाग यांनी प्रत्यक्ष दृश्य प्रणाली सादर केली आहे.लेखन आणि संवाद प्रतीक जाधव यांनी प्रभावीपणे केले आहे. ३० फूट बाय २० फुटाचा भव्य देखावा साकारण्यात आला आहे. १५ ते २० कारागिरांनी ४५ दिवस मेहनत घेऊन या देखाव्याची निर्मिती केली आहे.