Raigad News Pudhari
रायगड

Raigad News: अलिबाग तालुक्यातील रस्त्यांच्या कामांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना करण्याची भाजप नेते पंडित पाटील यांची मागणी

पिण्याच्या पाण्याचेही नियोजन बिघडले

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग: अलिबाग तालुक्यातील विविध भागांत सध्या सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार पंडित पाटील यांनी प्रशासनाकडे महत्त्वाची मागणी केली आहे. तालुक्यातील रस्त्यांची कामे विस्कळीतपणे न करता ती अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात यावीत, असे त्यांनी म्हटले आहे.

नियोजनाचा अभाव आणि नागरिकांचे हाल पंडित पाटील यांनी निदर्शनास आणून दिले की, अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असताना योग्य नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. रस्ते खोदल्यामुळे आणि कामाचा वेग मंदावल्यामुळे स्थानिक नागरिकांना, विशेषतः वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

पावसाळा किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे ही कामे अर्धवट राहिल्यास अपघातांचा धोका वाढण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच ग्रामीण भागात रेशन कार्डवर जसे धान्य मिळते तसे पाणी मिळत आहे. पाण्यासाठी आजही वणवण करावी लगत आहे. याबाबत प्रशासनाने गंभीरपणे पावले उचलावीत असेही पंडित पाटील म्हणाले.

काम करताना गुणवत्तेशी तडजोड नको असे त्यांनी म्हटले आहे. रस्त्यांची कामे केवळ वेळेत पूर्ण करायची म्हणून न करता ती दर्जेदार असावीत, जेणेकरून भविष्यात लवकर खराब होणार नाहीत. काम सुरू असलेल्या ठिकाणी वाहतुकीचे योग्य नियोजन करावे, जेणेकरून पर्यटकांची आणि स्थानिकांची गैरसोय होणार नाही.

कालबद्ध कार्यक्रम: प्रत्येक रस्त्याच्या कामाचा एक निश्चित कालावधी ठरवून देण्यात यावा आणि त्याचे काटेकोरपणे पालन व्हावे. अलिबाग हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा तालुका असल्याने येथील रस्ते सुस्थितीत असणे गरजेचे आहे. जर प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केले, तर नागरिकांच्या हितासाठी तीव्र पाठपुरावा केला जाईल, असा इशाराही पंडित पाटील यांनी दिला आहे.

या मागणीमुळे आता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासन काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.ग्रामीण भागात पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी टँकर टाकावेत. धरणातील गाळ काढावा जेणेकरून पाणी साठवण क्षमता वाढेल आणि स्वच्छ पाणी मिळेल असेही ते म्हणाले.

जिल्हा प्रशासनाला जाग

जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजप नेते, माजी आमदार पंडित पाटील यांनी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांची भेट घेऊन जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. बैठकीदरम्यान पायाभूत सुविधा, रस्त्यांची दुरुस्ती, पाणीपुरवठा, ग्रामविकास योजना आणि कायदा व सुव्यवस्था या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. काही ठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांमध्ये येणाऱ्या अडचणींबाबत पाटील यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT