Farmer ID : फार्मर आयडी  Pudhari News Network
रायगड

Farmer ID | अलिबाग तालुक्यातील शेतकऱ्यांनी १५ नोव्हेंबरपूर्वी फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करावी

पीएम किसानच्या सक्रिय लाभार्थ्यांपैकी ७८.१७ टक्के नोंदणी पूर्ण; २,८६० शेतकऱ्यांची नोंदणी अद्याप बाकी

पुढारी वृत्तसेवा

Alibag Farmer ID Registration

अलिबाग : केंद्र व राज्य शासनाच्या कृषीविषयक विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी फार्मर आयडी नोंदणी महत्त्वाची ठरत आहे. त्यामुळे अलिबाग तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक (AgriStack) अंतर्गत फार्मर आयडी नोंदणी १५ नोव्हेंबर २०२६ पूर्वी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी तन्मय भगत यांनी केले आहे. विशेषतः प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या आगामी २४ व्या हप्त्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी नोंदणीबाबत तत्परता दाखविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अलिबाग तालुक्यात आतापर्यंत एकूण २१ हजार २० फार्मर आयडी तयार करण्यात आले आहेत. यामध्ये ६०० शेतकऱ्यांनी स्वतःहून (सेल्फ रजिस्ट्रेशन) नोंदणी केली असून, २० हजार ४२० शेतकऱ्यांचे फार्मर आयडी सामाईक सेवा केंद्रांमार्फत (सीएससी) तयार करण्यात आले आहेत.

सक्रिय लाभार्थ्यांपैकी २,८६० शेतकरी नोंदणीपासून दूर

अलिबाग तालुक्यात पीएम किसान योजनेचे एकूण २० हजार ७७९ लाभार्थी आहेत. त्यापैकी १३ हजार १०१ लाभार्थी सक्रिय, तर ७ हजार ६७८ लाभार्थी असक्रिय आहेत. सक्रिय लाभार्थ्यांपैकी १० हजार २४१ शेतकऱ्यांनी फार्मर आयडीसाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे सक्रिय लाभार्थ्यांमधील नोंदणीचे प्रमाण ७८.१७ टक्क्यांवर पोहोचले आहे. मात्र, अद्याप २ हजार ८६० सक्रिय लाभार्थ्यांची नोंदणी प्रलंबित आहे.

दुसरीकडे, पीएम किसान योजनेतील असक्रिय लाभार्थ्यांपैकी १ हजार ८५० शेतकऱ्यांनीही फार्मर आयडीसाठी नोंदणी केली आहे. अशा प्रकारे सक्रिय आणि असक्रिय लाभार्थ्यांपैकी एकूण १२ हजार ९१ शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे. सक्रिय लाभार्थ्यांमधील नोंदणीचे प्रमाण १०० टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवले आहे.

वनपट्टाधारकांचे ४६५ अर्ज प्रलंबित

अलिबाग तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांचे ४६५ फार्मर आयडी नोंदणी अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. संबंधित शेतकऱ्यांनीही प्राधान्याने नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ॲग्रीस्टॅकअंतर्गत फार्मर आयडीमुळे शेतकऱ्यांची ओळख आणि शेतीविषयक माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तसेच, विविध शासकीय कृषी योजनांचा लाभ घेण्याच्या प्रक्रियेतही या नोंदणीला महत्त्व आहे.

पीएम किसान योजनेचा आगामी २४ वा हप्ता मिळण्याच्या प्रक्रियेत नोंदणीअभावी अडचणी निर्माण होऊ नयेत आणि पात्र शेतकरी शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी शेतकऱ्यांनी आपली नोंदणी स्थिती तपासून घ्यावी. फार्मर आयडी नोंदणीसाठी जवळच्या कृषी सहाय्यक, कृषी सेवक किंवा अधिकृत सामाईक सेवा केंद्राशी संपर्क साधावा. १५ नोव्हेंबरपूर्वी नोंदणी पूर्ण करून अलिबाग तालुक्यातील फार्मर आयडी नोंदणीचे उद्दिष्ट १०० टक्के साध्य करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT