सुवर्णा दिवेकर
अलिबाग: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अलिबाग तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांमध्ये घरांमध्ये पाणी शिरणे, घरांचे नुकसान झाले आहे. चार ठिकाणी भूस्खलन झाले आहे. तर रस्ते व पुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सुदैवाने या सर्व परिस्थितीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
महसूल प्रशासनाच्या अहवालानुसार, ५ जुलैअखेर तालुक्यात १,१६३ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर ६ जुलै रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ या कालावधीत ५३ मिमी, तर दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत आणखी ५ मिमी पाऊस झाला.
त्यामुळे तालुक्यातील एकूण पर्जन्यमान १,२२१ मिमीवर पोहोचले आहे. अतिवृष्टीमुळे आतापर्यंत ३२ पक्की घरे, ३ कच्ची घरे आणि २ गोठ्यांचे नुकसान झाले होते. त्यात आणखी १६ पक्की घरे, २ कच्ची घरे बाधित झाल्याने एकूण ३५ घरांचे आणि २ गोठ्यांचे नुकसान नोंदविण्यात आले आहे.
दरम्यान, चिंचोटी, कुर्डुस-डांगी, फुफादेवीपाडा आणि सोगाव येथील आदिवासी वाडी अशा चार ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. चिंचोटी येथील दोन कुटुंबांना खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षितस्थळी नातेवाईकांकडे स्थलांतरित करण्यात आले आहे.
तालुक्यातील अनेक सखल भागांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. कालवडखार (श्रीगाव), येलवणे, तळकर नगर व रोहिदास नगर (चेंढरे), भादाणे, गोठी, बहिरीचा पाडा, नवेदर-नवगाव, पेझारी चेकपोस्ट परिसर, डावाळे तसेच रेवदंडा येथील मोहसीन तांडेल यांच्या राईस मिलमध्ये पाणी शिरल्याची नोंद आहे.
हशिवारे गावातील रामुबाई रामचंद्र म्हात्रे आणि शांताराम धर्मा म्हात्रे यांच्या घरावरील पत्र्याचे शेड जोरदार वाऱ्यामुळे उडून नुकसान झाले आहे.
मुख्य मार्गांपैकी अलिबाग-रेवस, अलिबाग-वडखळ, अलिबाग-रामराज-रोहा आणि अलिबाग-रेवदंडा-मुरुड हे रस्ते वाहतुकीसाठी सुरू आहेत. पावसामुळे काही ठिकाणी झाडे पडली होती; मात्र ती तातडीने हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
तथापि, अलिबाग-रोहा मार्गावरील रामराज-बोरघर पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच नवेदर-नवगाव आणि किहीम यांना जोडणारा पूल खचल्यामुळे तो मार्गही बंद ठेवण्यात आला आहे. खानाव येथील पुलाला भगदाड पडल्याने कोणत्याही क्षणी पूल धोकादायक ठरू शकतो, त्यामुळे या मार्गावरून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.
महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायती आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असून बाधित भागांमध्ये आवश्यक ती मदत आणि पाहणी सुरू आहे.
सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे, सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.