अलिबाग: अलिबाग तालुक्यातील वडवली आदिवासीवाडी येथे होणारा बालविवाह पोयनाड पोलिसांनी तात्काळ कारवाई करून रोखला. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित कुटुंबीयांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याबाबत मार्गदर्शन करत विवाह रद्द करण्यास प्रवृत्त केले.
11 मे 2026 रोजी पोलीस पाटील परशुराम कृष्णा पाटील यांनी वडवली आदिवासीवाडी येथे बालविवाह होत असल्याची माहिती पोयनाड पोलीस ठाण्याला दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आर. जी. नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी ओ. पी. घरत आणि पी. व्ही. घरत यांना तातडीने घटनास्थळी पाठविण्यात आले.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता लग्नाची संपूर्ण तयारी झालेली होती. त्यानंतर नवरा मुलगा आणि नवरी मुलगी यांच्या वयासंदर्भातील कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. नवरी मुलगी ऋतीका शाम नाईक (वय 19 वर्षे, रा. चिखली आदिवासीवाडी, कुसुंबळे, ता. अलिबाग) हिच्याकडे आधारकार्डाद्वारे वय पूर्ण असल्याचे स्पष्ट झाले. मात्र नवरा मुलगा विकास सदानंद पवार (रा. वडवली आदिवासीवाडी, ता. अलिबाग) याच्याकडे कोणतेही अधिकृत कागदपत्र नव्हते. चौकशीदरम्यान त्याने स्वतःची जन्मतारीख 1 मे 2006 असल्याचे सांगितले.
त्यावरून विवाहासाठी आवश्यक असलेले कायदेशीर वय पूर्ण झाले नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलीस निरीक्षक आर. जी. नदाफ यांनी दोन्ही कुटुंबीयांना बालविवाह केल्यास कायदेशीर गुन्हा दाखल होऊ शकतो तसेच त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात, याबाबत सविस्तर समज दिली.
पोलिसांच्या मार्गदर्शनानंतर दोन्ही कुटुंबीयांनी होणारा विवाह तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच नवरा मुलाचे वय कायदेशीरदृष्ट्या पूर्ण होईपर्यंत विवाह करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या तातडीच्या आणि संवेदनशील कारवाईमुळे संभाव्य बालविवाह रोखण्यात पोयनाड पोलिसांना यश आले असून परिसरात या कारवाईचे स्वागत होत आहे. त्यामुळे बालविवाह रोखण्यासाठी समुपदेशन अधिक प्रभावी ठरत आहे.
नवरा मुलगा अल्पवयीन
पोलिसांनी नवरा मुलगा आणि नवरी मुलगी यांच्या वयासंदर्भातील कागदपत्रांची तपासणी केली. नवरी मुलगी हिच्याकडे आधारकार्डाद्वारे वय पूर्ण असल्याचे स्पष्ट झाले. मात्र नवरा मुलगा विकास सदानंद पवार याच्याकडे कोणतेही अधिकृत कागदपत्र नव्हते. चौकशीदरम्यान त्याने स्वतःची जन्मतारीख 1 मे 2006 असल्याचे सांगितले. त्यामुळे अल्पवयीन असल्याचे समोर आले