रायगड: महाराष्ट्रातील काही भागांत हिंसाचाराच्या घटना घडल्याचं समोर आलं आहे. या संदर्भात मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, हिंसाचाराला आपल्या लोकशाहीत कोणतंही स्थान नाही.
निवडणूक ही पवित्र प्रक्रिया आहे आणि प्रत्येक नागरिकाला सुरक्षित वातावरणात, कोणाच्याही दबावाखाली न येता मतदानाचा आपला मूलभूत हक्क बजावता आला पाहिजे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या एक्स-हॅंडलवर म्हटले आहे. महाड नगरपरिषदेच्या मतदानाच्या निमीत्ताने शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस कार्याकत्यार्ंमध्ये झालेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी हे म्हणतानाच, शांतता भंग करण्याचे प्रयत्न सहन केले जाणार नाहीत अशा इशारा शिंदे शिवसेनेचे मंत्री भरत गाेगावले यांना दिला आहे.
आपलं अमूल्य मत कोणाला द्यायचं, कोणाला निवडून आणायचं हे जनतेला ठरवू द्या. आघाडी हा धर्म राजकीय वर्तुळातील सर्वांनी पाळला पाहिजे. परंतु त्याही पुढे जाऊन, जो कोणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न करेल किंवा जोर-जबरदस्तीनं मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करेल, तो संविधानाच्या विरोधात आणि महाराष्ट्राच्या मूल्यांच्या विरोधात वागत आहे. अशा प्रकारचं वर्तन कोणत्याही परिस्थितीत सहन केलं जाणार नाही., असे पवार यांनी पूढे म्हटले आहे.