

Ajit Pawar Chief Minister Remark: नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांचा प्रचार आज अंतिम टप्प्यात पोहोचला असून सर्व पक्षांचे नेते मतदारांशी थेट संवाद साधताना दिसत आहेत. पुण्यातील राजगुरुनगरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभेदरम्यान मात्र एक अनपेक्षित प्रसंग घडला आणि संपूर्ण सभेत एकच हशा पसरला.
सभेत मंचावरून एका कार्यकर्त्याने उत्साहात भाषण करताना अजित पवारांचा परिचय—
“आपले मुख्यमंत्री…” असा करून दिला. हा शब्द कानावर पडताच अजित पवारांनी ताबडतोब स्मित करत त्याला थांबवलं. “थांब, थांब… अजून एवढी उंची गाठलेली नाही! मला 'उपमुख्यमंत्री' म्हणा.” या एका प्रत्युत्तराने वातावरण आनंदी झालं आणि सभेत लोक हसू लागले.
यानंतर अजित पवारांनी भाषणात आपल्या कामाच्या शैलीबद्दल बोलताना तिखट प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले “माझ्यावर चोरी, भ्रष्टाचाराचे आरोप करतात. पण कुणी एक जण दाखवून देऊ शकत नाही की मी कोणाकडून पैसे घेतले. उलट प्रशासन मला पाहून जरा सावरूनच काम करतं, कारण मी कामात दिरंगाई सहन करत नाही. करणारा माणूस आहे”
राजगुरूंच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गावच्या सभेत त्यांनी लोकांना आवाहन केलं “माणुसकीला जात नसते. इथल्या प्रत्येक समस्येकडे मी राजकीय चष्म्याऐवजी मानवी नजरेतून पाहतो.”
अजित पवार पुढे म्हणाले “तुमचे काही प्रश्न आहेत, ते मी हिवाळी अधिवेशनात नक्की मांडणार. पण आचारसंहिता असल्याने आत्ता जास्त काही बोलू शकत नाही. तरीही मी तुमचं म्हणणं ऐकायला तयार आहे… तुम्हीही माझ्यावर विश्वास ठेवा.”