Mahad Veereshwar Maharaj Chhabina Festival Pudhari
रायगड

Mahad Veereshwar Maharaj Chhabina Festival: महाडचे आराध्यदैवत श्रीगावदेव वीरेश्वर महाराज

84 गावांचा सहभाग, शेकडो वर्षांची परंपरा आणि आधुनिक काळातही टिकून असलेली श्रद्धा

पुढारी वृत्तसेवा

सांस्कृतिक वारसा लाभलेल्या व क्रांतिकारक घटनांचा इतिहास सर्वदूर पसरलेल्या शहराचे ग्रामदैवत देखिल तेवढेच जागरूक असणारच. आज या देवतेचा म्हणजेच श्री वीरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव महाडकर नागरीक व शिवभक्तांच्या मार्फत उत्साहात सुरू आहे. या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेल्या उत्सवानिमित्त विशेष लेख.

श्रीकृष्ण बाळ, महाड

या देवाचा छबिना उत्सव सात दिवस चालतो. पूर्वीच्या काळी एक महिनाभर सारे व्यापारी आपली दुकाने येथे थाटत. गावातल्या मंडळींना वस्तू खरेदी करण्यासाठी यात्रेत यावे लागत असे. या उत्सवात तांबट, सोनार, भोई, अदबगिरे, कुंभार, जंगम, गोंधळी, परीट, बुरूड, कातकरी ही सारी मंडळी मानकरी असतात. ही मंडळी देवाची मनोभावे सेवा करतात. देवाचा छबिना उठतो ती वेळ पहाटेची असते. उजेडासाठी खोबरे जाळून उजेड केला जातो. या मशाली धरण्याचे काम कातकरी समाजाची मंडळी मनोभावे करतात. मात्र बदलत्या काळात परंपरा-रीतिरिवाज जैसे थे जपत या उत्सवाची व्याप्ती वाढली आहे. सद्य:स्थितीत ज्येष्ठ नागरीक, वयोवृद्धांसह तरुणाई, महिला वर्गसुद्धा रात्रीच्या कीर्तनात दंग होऊन धार्मिक वसा वाढवत आहेत. मोबाईलच्या व तंत्रज्ञानाच्या युगात हरवणारी पिढी महाडमधील या सात दिवसांच्या उत्सव काळात भक्तिरसात न्हाऊन निघत आहे.

सासनकाठी खांद्यावर घेत नाचवित व नगारा, खालूबाज्याच्या तालावर पाय थिरकवत नाचणे हे वाखाणण्याजोगी म्हणावे लागेल. अनेक महिला सुद्धा सासनकाठी किंवा पालखी खांद्यवर घेत धार्मिकतेचा वसा पुढे नेत आहेत. शिवकालीन शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या महाडच्या श्री गावदेवी वीरेश्वर महाराजांचा हा छबिना उत्सव आजही देवालयाचे विश्वस्त साऱ्या गावाला बरोबर घेऊन उत्साहात साजरा करतात. आपली कामे बाजूला ठेवून अहोरात्र विश्वस्त मंडळ सेवेकरी समवेत या उत्सवाकरिता सुमारे एक महिना आधीपासून तयारीला सुरुवात करते. या उत्सव काळात महाड परिसरातील 84 गावांतील लोकांची व्यवस्था या विश्वस्त मंडळामार्फत पाहिली जाते. गावदेव वीरेश्वर महाराजांचा परिवार या यात्रेसाठी विविध गावांतून येतो. लोक काठ्या, पालख्या घेऊन यात्रेसाठी येत असतात. आलेल्या देवदेवतांना भेटण्यांसाठी सारा गाव देवालयाकडे या आठ दिवसांमध्ये जमा होतो. आधीचे पूर्ण झालेले नवस पूर्ण करण्यासाठी व नव्याने आपल्या इच्छांच्या पूर्ततेसाठी शेकडोंच्या संख्येने भाविक या काळात मंदिरांमध्ये हजर असतात.

सुमारे आठ दिवस चालणाऱ्या या यात्रा काळात महाडनगरातील संपूर्ण वातावरण प्रसन्न झाल्याचा स्वानुभव घेता येतो. हा छबिना उत्सव हा महाडकर नागरिकांसह या गावांतील पाहुण्या मंडळींचा गेल्या काही वर्षात प्रेरणास्थान झाल्याचे पहावयास मिळते.

छबिना उत्सवातील पालख्या

ऐतिहासिक दप्तरातून शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या श्री विरेश्वर महाराज यांच्या छबिना उत्सवात सहभागी होणाऱ्या महाड परिसरातील विविध गावातील काठ्या व पालख्यांच्या संदर्भात संबंधित गावांतील ग्रामस्थ व लोकप्रतिनिधीशी केलेल्या चर्चेनुसार अनेक गोष्टींची माहिती नव्याने समोर आली आहे. ज्येष्ठ नागरिक म्हणून या उत्सवात सहभागी होणाऱ्या मान्यवरांशी केलेल्या चर्चेतून या पालखी उत्सवात सहभागी होणाऱ्या काठया व पालख्यांमध्ये विन्हेरे, शिरगाव, चोचिंदे, सव, गोठे, म्होहोप्रे, माडले, दासगाव, नाते या गावांतील ग्रामदेवतेच्या पालख्यांसह काठ्यांचा समावेश होतो. या विविध गावांतील ग्रामदेवता वीरेश्वर महाराज यांचे भाऊ व बहीण या नात्याने या छबिना उत्सवात सहभागी होतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT