रायगड : रायगडातील १० नगरपालिकांमधील दहा नगराध्यक्ष आणि २०९ नगरसेवकांच्या निवडीसाठी मंगळवारी (२ डिसेंबर) रायगडात मतदान होत आहे. या मतदानासाठी अडीच लाख मतदार आपल्या नगरांचे नवे कारभारी निवडणार आहेत. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. एक दिवसाचा मतदार राजा आपले बहुमोल मत कुणाच्या पारड्यात टाकतोय, याबाबत कमालीची उत्सुकताही लागली आहे.
जिल्ह्यातील दहा नगरपालिका हद्दीत ३०८ केंद्रांमध्ये ही प्रक्रिया पार पडणार आहे. दोन लाख ३७ हजार ५०३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासाकडून तयारी जोरात सुरु केली आहे. मतदान केंद्रांची पाहणी करण्यापासून कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहेत. जिल्ह्यातून सुमारे दोन हजार कर्मचारी मतदान व मतमोजणीच्या कामासाठी लागणार आहे.
सोशल मीडियावर लक्ष केंद्रित
या निवडणुकीत उमेदवारांकडून सोशल मीडियाचा सर्रासपणे वापर करण्यात आला. मतदारांपर्यंत थेट पोहोचता आले नाही तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवारांनी केल्याचे दिसून आले. शहरात वाहनांतून राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार रात्रीपर्यंत सुरू होता. सोशल मीडियावरील प्रचारावर निवडणूक तसेच पोलीस यंत्रणाही लक्ष ठेऊन होती.
आज येथे निवडणूक
रायगडात अलिबाग, पेण, कर्जत, माथेरान, उरण, खोपोली, रोहा, मुरुड, महाड, श्रीवर्धन या दहा नगरपालिकांच्या १० नगराध्यक्षपदांसाठी आणि २१७नगरसेवकांच्या निवडीसाठी मंगळवारी ईव्हीएम द्वारे मतदान घेतले जात आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झालेली आहे. नगराध्यक्षपदासाठी ३४ आणि नगरसेवकपदासाठी ५९५ असे एकूण ६२९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या नगरपरिषदांच्या हद्दीत १०७ प्रभाग आहेत. नगराध्यक्षपदाच्या दहा आणि नगरसेवकपदाच्या २१७जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
अखेरच्या दिवशीही प्रचाराचा जोर
रविवारी जिल्ह्यात प्रचाराचा सुपरसंडे ठरला. सोमवारी रात्री दहा पर्यंत प्रचाराचा कालावधी देण्यात आला होता. या काळातही अनेक ठिकाणी उमेदवारांनी प्रत्यक्ष मतदारांना भेटून आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र कुठेही जाहीर, कॉर्नरसभा झाल्या नाहीत. रविवारी जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोह्यात रॅली काढली होती. याशिवाय अन्य शहरातही सर्वच राजकीय पक्षांनी बाईक रॅलीद्वारे मतदारांशी संवाद साधत शक्तिप्रदर्शन केले.