Poladpur Dharavali Kendra School
पोलादपूर : नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात सोमवारपासून (दि.१५) होत असताना पोलादपूर तालुक्यातील धारवली येथील 127 वर्षे जुन्या केंद्रशाळेकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रस्त्याचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे. महसूल विभाग, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या सहभागातून शाळेकडे जाणारा रस्ता उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेण्यात आले असून यामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित व सुलभ मार्ग उपलब्ध होणार आहे.
धारवली केंद्रशाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पावसाळ्यात जीव धोक्यात घालून बिकट पायवाटेने प्रवास करावा लागत होता. या गंभीर समस्येची दखल घेत ग्रुप ग्रामपंचायत धारवलीने शाळा सुरू होण्यापूर्वीच तातडीने पर्यायी रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार कामालाही सुरुवात करण्यात आली.
याशिवाय मुख्यमंत्री बळीराजा शेत-पानंद रस्ते योजनेअंतर्गत शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याचे पूर्णत्वाचे कामही लवकरच हाती घेण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायतीकडून देण्यात आली.
या प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेत सरपंच विलास सकपाळ, उपसरपंच वैभव शिंदे तसेच ग्रुप ग्रामपंचायत धारवलीच्या सर्व सदस्यांनी तातडीने निर्णय घेतला. निर्णयानंतर रस्ता दुरुस्ती आणि मार्गनिर्मितीच्या कामाची अंमलबजावणीही तत्काळ सुरू करण्यात आली.
या उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, धारवली यांच्या वतीने सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवक अजित पोळेकर यांचे विशेष आभार मानण्यात आले. तसेच तहसीलदार कपिल घोरपडे, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी मंगेश पवार, संबंधित तलाठी तसेच पोलीस पाटील रोशन सकपाळ यांनी दिलेल्या सहकार्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
स्थानिक ग्रामपंचायतीच्या पुढाकारामुळे धारवली केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सुलभ मार्ग उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला असून पालकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान, या रस्त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनाही शेतरस्त्याची सुविधा मिळणार असून वर्षानुवर्षे पडीत राहिलेली काही क्षेत्रे पुन्हा वहिवाटीखाली येण्यास मदत होईल, अशी माहिती तहसीलदार कपिल घोरपडे यांनी दिली.