पुणे

‘स्वच्छ एटीएम’चा बोजवारा; देखभाल करणार्‍या कंपनीलाच पालिकेची ठेका रद्द करण्याची नोटीस

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: सहा महिन्यांपूर्वी महापालिकेने सुरू केलेल्या 'स्वच्छ एटीएम' प्रकल्पाचा बोजवारा उडाला आहे. मशिनची देखभाल दुरुस्ती करणार्‍या कंपनीलाच महापालिकेने कामाचा ठेका रद्द करण्याची नोटीस पाठविली आहे. शहराची स्वच्छता राखण्यासाठी आणि नागरिकांना टाकावू वस्तूंपासून पैसे मिळावेत, या उद्देशाने महापालिकेने सहा महिन्यांपूर्वी दक्षिण दिल्ली,

उत्तर दिल्ली, वाराणसी आदी शहरांप्रमाणेच पुण्यात प्रायोगिक तत्त्वावर जंगली महाराज रस्ता, सेनापती बापट रस्ता, कोरेगाव पार्क, खराडी आयटी पार्क, हायस्ट्रीट बालेवाडी, कोथरूड एमआयटी कॉलेज व पौड रोड तसेच राजीव गांधी उद्यान कात्रज व सारसबाग येथे स्वच्छ एटीएम मशिन बसविल्या होत्या.

प्लास्टिक बॉटल्स, ग्लास, मेटालिक कॅन्स, प्लास्टिक रॅपर्स कचरा पेटीत न टाकता 'स्वच्छ एटीएम'मध्ये टाका व पैसे मिळवा, अशी ही योजना होती. मात्र, काही दिवसांतच मशिनची तोडफोड करण्याचे प्रकार घडले. त्यामुळे या मशिन दुरुस्त करण्याच्या सूचना महापालिकेने संबंधित कंपनीला दिल्या होत्या. मात्र, कंपनीने अद्याप या मशिन दुुरुस्त न केल्याने महापालिकेने कंपनीला नोटीस पाठवली आहे. तीस दिवसांत दुरुस्ती केली नाही तर तुमचा ठेका रद्द केला जाईल, असे या नोटिशीमध्ये नमूद असल्याचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी सांगितले.

किती जणांनी घेतला लाभ?

मशिन बसविल्यानंतर ते चालू असेपर्यंत प्रत्येक ठिकाणी साधारणत: 800 ते 1200 नागरिकांनी पुनर्वापरयोग्य असे प्लास्टिक टाकले. यातून (प्रतिनग) प्लास्टिकच्या बाटलीसाठी 1 रुपया, काचेच्या बाटलीसाठी 3 रुपये, धातूच्या कॅन्ससाठी 2 रुपये संबंधित नागरिकांना मिळाले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT