पुणे

‘स्पेशल छब्बीस’चा डाव फसला; प्राप्तिकर अधिकारी असल्याचा बनाव उघड

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा: अक्षयकुमारचा 'स्पेशल छब्बीस' हा हिंदी चित्रपट आपल्याला आठवत असेल. तो आणि त्याचे सहकारी प्राप्तिकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून अनेक ठिकाणी छापा टाकत होते. गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन जप्त केलेला ऐवज घेऊन पळ काढत होते. असाच काहीसा प्रकार वारजे जकातनाका कर्वेनगर परिसरात समोर आला आहे. शुक्रवारी (दि. 24) सकाळी तीन जण 'आम्ही अँटिकरप्शनचे पोलिस आहोत,' असे सांगून नगररचना उपसंचालकांच्या घरात शिरले. त्यांचे मोबाईल काढून घेऊन कारवाईचा बहाणा केला. मात्र, याची माहिती उपसंचालकांच्या मुलाने सकाळी गस्तीवर असलेल्या वारजे पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांची एन्ट्री झाली अन् त्यांचा डाव फसला.

'आम्हाला कल्पना न देता कसे आलात?' असे गस्तीवरील महिला पोलिस उपनिरीक्षकांना म्हणत वरिष्ठ अधिकार्‍यांना फोन करण्याचा बहाणा करून या तोतयाने पळ काढला. या प्रकरणी नगररचना विभागाच्या उपसंचालकांनी वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी साध्या वेशातील सावंत व पोलिस गणवेशातील एक पुरुष व महिला, अशा तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कर्वेनगरमधील दत्तदिगंबर कॉलनीत शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई अँटिकरप्शनकडून आलो असल्याचे सांगून तिघांनी नगररचना संचालकांच्या घरात सकाळी साडेसहा वाजता प्रवेश केला. त्यातील एकाने पोलिस गणवेश परिधान केला होता. घरात प्रवेश करताच सुरुवातीला त्याने सर्वांचे मोबाईल काढून एका टेबलावर ठेवले. यानंतर '23 जून रोजी तुमच्या ऑफिसमध्ये काय झाले?' याची विचारणा केली. त्यांनी त्यांच्याकडील एक व्हिडीओ दाखवून त्यामध्ये एक व्यक्ती झोन दाखल्याबाबत आला होता. त्याबाबत फिर्यादीने माहिती दिली. त्यावर या तोतयाने, 'तुमच्या ऑफिसमधील एकाने झोन दाखल्यासाठी आलेल्याकडे पैशांची मागणी करून काही रक्कम घेतली आहे. तसेच तुमचे नावदेखील आले आहे. त्यामुळे तुम्हाला

त्यात अटक करून तुमची प्रॉपर्टी जप्त करावी लागेल,' असे सांगितले. 'हे नको असेल तर पाच लाख रुपये द्यावे लागतील,' असे तो तोतया अधिकारी म्हणाला. उपसंचालकांच्या घरात त्यांचा मुलगा आणि आणखी एक नातेवाईक राहतात. आरोपींनी त्यांच्या घरात पाहणी करण्यास सुरुवात केली. त्या वेळी उपसंचालकांचा मुलगा घरातून बाहेर आला. त्या वेळी वारजे पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक तृप्ती पाटील गस्तीवर होत्या. मुलाने पाटील यांना पाहिले. त्याने घरात पोलिस आल्याचे सांगितले.

एवढ्या सकाळी पोलिस येथे कसे काय पोहचले? हे पाहण्यासाठी पाटील तेथे गेल्या. त्यांना पाहून हा तोतया म्हणाला, 'तुम्ही आम्हाला कल्पना न देता या ठिकाणी कसे आलात? तुमच्या सीनिअर पीआयचा नंबर द्या,' असे त्यांना म्हणाला. त्यांनी नंबर दिल्यावर फोन लावण्याचा बहाणा करून तो घराबाहेर गेला व तेथून पळून गेला. पाटील यांनी खूप उशीर झाला तरी अधिकारी वर आला नाही. यामुळे खाली जाऊन पाहिले असता ते सर्व गायब झाल्याचे दिसून आले.

'तुम्ही येथे कशा आलात?'
'वरिष्ठांच्या आदेशानुसार परिसरात गस्तीवर होतो. त्या वेळी त्याने आपल्यालाच 'तुम्ही येथे कशा आलात?' असे म्हणत माझ्याकडून वरिष्ठांचा नंबर घेतला. त्या वेळी मला माझ्या अधिकार्‍यांचा फोन येत होता; पण तोही घेऊ दिला नाही. वरिष्ठांना बोलण्याचा बहाणा करून तो घराबाहेर गेला. तेव्हा आम्ही घरातच वाट पाहत होतो. काही वेळाने बाहेर येऊन पाहिल्यावर तो पळून गेल्याचे लक्षात आले,' असे पाटील यांनी सांगितले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पार्वे करीत आहेत.

असा झाला प्रकार उघड
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई सुरू असेल, तर त्यात हस्तक्षेप केला जात नाही, नाहीतर तुमच्यामुळे आमची कारवाई फसली, असे म्हणत संबंधित अधिकार्‍याला दोष दिला जातो. कर्वेनगरमध्ये कारवाई सुरू असल्याचे समजल्यावर पोलिस अधिकार्‍यांना पाठविले होते. तेव्हा हा प्रकार समोर आला, अशी माहिती वारजे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर खटके यांनी दिली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT