पुणे

शिरूरचे मतदार टिंगरेनगरमध्ये; प्रारूप मतदारयादीत घोळ

अमृता चौगुले

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये टिंगरेनगर- संजय पार्क या प्रभाग क्र. 2 मध्ये थेट शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक गावातील सव्वाशे मतदारांची नावे आली आहेत. 'हा मतदार याद्यांतील घोळ आहे की बोगस मतदार घुसविण्याचा प्रकार आहे, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. महापालिकेची प्रारूप मतदार यादी गुरुवारी निवडणूक विभागाने जाहीर केली. या मतदार यादीवर हरकती-सूचनांनी प्रक्रिया झाल्यानंतर अंतिम मतदार यादी दि. 9 जुलैला प्रसिद्ध होणार आहे.

मात्र जाहीर झालेल्या प्रारूप यादीत कशा प्रकारचा गोंधळ आहे याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रभाग क्र. 2 टिंगरेनगर- संजय पार्क या प्रभागात वढू बु. या गावातील तब्बल 123 मतदारांची नावे आली आहेत. वढू बु. हा शिरूर विधानसभेतील आणि जिल्हा परिषदेच्या हद्दीतील गाव आहे. असे असताना थेट महापालिका हद्दीतील मतदार यादीत ही नावे आली असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे सुहास टिंगरे यांनी केली आहे. या गोंधळाबरोबरच याच प्रभागात अन्य भागातील जवळपास दीड हजार मतदारांची नावे आली असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान वढू बु. येथील मतदारांच्या नावाबद्दल अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे म्हणाले, 'वाघोली गावाचा आता पालिकेत समावेश झाला आहे. वाघोली हे शिरूर मतदारसंघात आहे. त्यामुळे तांत्रिक पद्धतीने अथवा नाव साधर्म्यामुळे तेथील मतदारांची नावे प्रभाग 2 मध्ये चुकून लागली असू शकतील. याबाबत चौकशी करून कार्यवाही केली जाईल.'

हेही वाचा

SCROLL FOR NEXT