पुणे

शिक्षकांना दिलासा : मतदान झालेल्या मतदारसंघांमध्ये शिक्षक नियुक्ती

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्यक्ष मतदान झालेल्या ठिकाणातील शिक्षकांच्या नियुक्तीबाबत कार्यवाही करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार राज्याच्या ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव यांना विनंती करण्यात आली असून, जिल्हा परिषदेच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना त्यांच्याकडून शिक्षक भरती संदर्भातील निर्देश दिले जात आहेत, अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली.

शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबविल्या जात असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेला लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अडथळे निर्माण झाले होते. परंतु निवडणूक झालेल्या जिल्ह्यात शिक्षक भरतीची पुढील प्रक्रिया करण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. त्याबाबत शिक्षण विभागाने बुलेटीन प्रसिद्ध केले असून, त्यात जिल्हा परिषदेचे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना त्यांच्याकडून शिक्षक भरती संदर्भातील निर्देश दिले जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

पहिल्या फेरीतील कार्यवाही सुरू असतानाच पुढील निवड फेरी घेण्याच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करून प्रशासकीय प्रक्रिया करण्यात येत आहे. पुढील फेरीमधील माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व तत्सम पदातील वेगवेगळ्या घटकांच्या मागण्या विचारात घेता समन्यायी पद्धतीने व शासन निर्णयातील सूचनांचे योग्य ते पालन करून भविष्यात कोणतीही न्यायालयीन गुंतागुंत होऊ नये याची योग्य ती दक्षता घेऊन कार्यवाही करण्यात येत आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन पुढील निवड फेरीसुद्धा लवकरात लवकर घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत.

2017 भरती मधील दि. 29/11/2023 रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीबाबत न्यायालयीन प्रकरणांमधील स्थगनादेश उठवण्याच्या दृष्टीने सिविल एप्लीकेशन दाखल करण्यासंदर्भात शासकीय अभियोग्यता यांना विनंती करण्यात आली असून, त्याबाबतची न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. उर्वरित भरती प्रक्रिया तसेच भरती प्रक्रियेतील अन्य अडचणी दूर करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सतत केला जात आहे.

संभ्रम पसरविण्याचा प्रयत्न

या भरती प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासूनच काही मंडळी कोणतीही अधिकृत माहिती नसताना तसेच प्रशासकीय कार्यपद्धती, निर्णय प्रक्रिया अथवा नियम याची जुजबी माहितीसुद्धा नसताना स्वतःच्या मनाने काही संभ—म निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यापासून सावध राहावे. तसेच ज्या वेळी महत्त्वाच्या घटना घडतील त्या वेळी बुलेटिनद्वारे माहिती दिली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT