पुणे

‘वैद्यकीय’ महाविद्यालयाच्या दुसर्‍या वर्षाची मान्यता धोक्यात

अमृता चौगुले

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : मोठा गाजावाजा करीत महापालिकेने स्वत:च्या वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळवत पहिल्या वर्षाचे वर्ग सुरू केले खरे, पण महाविद्यालयासाठी नायडू रूग्णालयाच्या जागी उभी करण्यात आलेली इमारत अजूनही पूर्णपणाने रिकामीच आहे. परिणामी महापालिकेच्या एका शाळेत वर्ग सुरू करण्याची वेळ महापालिकेवर आली. त्याबाबत अजूनही जागेवर काहीही हालचाल नसल्याने आता
दुसर्‍या वर्षाच्या वर्गासाठी नँशनल मेडिकल कमिशनची परवानगीच न मिळण्याची नामुष्की महापालिकेवर येण्याची शक्यता आहे.
वैद्यकीय महाविद्यालयासाठी मागच्या वर्षीच्या जुलै-ऑगस्टपासून प्रवेश प्रक्रिया सुरु होणे अपेक्षित होते.

त्यासाठी महापालिकेच्या कै. बाबुराव सणस शाळेमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचे वर्ग सुरु करण्याच्या दृष्टीने मूलभूत सुविधा उभारण्यात आल्या. नॅशनल मेडिकल कमिशनने अचानक पाहणी करून सोयी-सुविधांमधील त्रुटी निदर्शनास आणून देऊन परवानगी देण्यास असमर्थता दर्शवली. त्रुटी दूर करून महापालिकेने पुन्हा एकदा अर्ज केला आणि एमबीबीएसचे प्रवेश शेवटच्या टप्प्यात असताना एनएमसीने परवानगी दिली. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात केवळ पहिल्या वर्षासाठीच आणि 100 जागांसाठीच प्रक्रिया सुरु झाली. हे पहिले वर्ष येत्या काही महिन्यांत संपणार असून दुसर्‍या वर्षाचे वर्ग सुरू होणे अपेक्षित आहे. मात्र दुसरे वर्ष सुरू होण्यास जेमतेम पाच-सहा महिन्यांचाच कालावधी असताना तेथे कोणतीही तयारी करण्यात आलेली नसल्याचे पुढारीच्या पाहणीत आढळून आले.

महापालिकेच्या संथ कारभारामुळे दुस-या वर्षाला नॅशनल मेडिकल कमिशनने अचानक भेट दिल्यास मोकळी इमारत पहावी लागणार आहे. मुलभूत सुविधा नसल्यामुळे दुस-या वर्षाला मान्यता मिळणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नायडू रूग्णालयाच्या जागी महापालिकेने नवी इमारत उभी केली. नव्या इमारत आणि सुविधांसाठी 650 कोटी रुपये खर्च करण्याची घोषणा करण्यात आली. त्याची कार्यवाही मात्र अद्याप झालेली नाही. नॅशनल मेडिकल कमिशनच्या कमिटीने ऑगस्टमध्ये भेट दिल्यास आणि काम अपुरे असल्याचे निदर्शनास आल्यास महाविद्यालयाच्या मान्यतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जाऊ शकते. विद्यार्थी आणि प्राध्यापक यांचे भवितव्य धोक्यात येऊ नये, यासाठी महापालिकेला वेगवान हालचाली कराव्या लागणार आहेत.

केंद्र शासन, भारतीय आयुर्विज्ञान परिषद आणि राज्य शासन यांच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाबाबत नियमांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक आहे. राज्याच्या विविध भागातून विद्यार्थ्यांनी मोठ्या अपेक्षेने महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतले आहेत. येथील प्राध्यापकही वेगवेगळया प्रतिष्ठित वैद्यकीय महाविद्यालयांमधून येऊन येथे रुजू झाले आहेत. त्यामुळे महाविद्यालयाचा कारभार लाल फितीत न अडकवता प्रक्रिया गतिमान व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. दुसर्‍या वर्षासाठी नॅशनल मेडिकल कमिशनची मान्यता घ्यावी लागणार आहे. त्यासाठी एनएमसीचे पथक पुढील महिन्याभरात पूर्वकल्पना न देता भेटीसाठी येऊ शकते. दुसर्या वर्षाच्या वर्गांसाठी डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाच्या आवारातील नवी इमारत मोकळी करण्यात आली आहे. परंतु, तेथे मुलभूत सोयी सुविधा देण्याचे कामही सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या भवितव्याबाबत महापालिकेला गांभीर्य नसल्याचा आरोप केला जात आहे.

सध्या सणस विद्यालयात पहिल्या वर्षासाठी वर्गखोल्या, प्रयोगशाळा अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत. डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाच्या आवारात असलेल्या इमारतीमध्ये दुसर्‍या वर्षाचे वर्ग भरवण्याचे नियोजन आहे. याबाबतच्या परवानगीची प्रक्रिया सुरु आहे. विद्यार्थ्यांना कोणत्याही असुविधेला सामोरे जावे लागणार नाही.

– डॉ. आशिष बंगिनवार, अधिष्ठाता, भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय

डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयातील साहित्य बाणेर येथील महापालिकेच्या रुग्णालयात शिफ्ट करण्यात आले आहे. डॉ. नायडू रुग्णालयात फर्निचर आणि वर्ग सुरू करण्यासाठी लागणार्‍या सर्व सोयी-सुविधा उभारण्यात येतील. त्याची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

                                                     – मुरलीधर मोहोळ, माजी महापौर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT