ऐन पावसाळ्यात 51 टँकर सुरू; जिल्ह्यातील 96 हजार नागरिकांची भागवली जातेय तहान | पुढारी

ऐन पावसाळ्यात 51 टँकर सुरू; जिल्ह्यातील 96 हजार नागरिकांची भागवली जातेय तहान

पुणे : पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पाऊस होत आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधील 43 गावांतील 96 हजार नागरिकांना 51 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पावसाने जून महिन्यात पाठ फिरवली. त्याचा परिणाम धरणांमधील पाणीसाठ्यात घट झाली. आंबेगाव, बारामती, भोर, हवेली, जुन्नर, खेड, पुरंदर, शिरूर आणि वेल्हा अशा नऊ तालुक्यांमधील 43 गावे, 273 वाड्यांना खासगी 51 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात एकही शासकीय टँकर सुरू नसून, सर्व तहानलेल्या गावांना खासगी टँकरनेच पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

जुन्नर आणि खेड तालुक्यांमध्ये अनुक्रमे 15 हजार 48 आणि 28 हजार 758 बाधित लोकसंख्या असून संबंधितांना प्रत्येकी नऊ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या दोन्ही तालुक्यांत 14 आणि नऊ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. बारामती, भोर, पुरंदर आणि वेल्हा तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक टँकर सुरू असून, हवेली तालुक्यात पाच टँकर सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

इथे चांगला पाऊस
मावळ 77.37 मिमी
वेल्हा 68.50 मिमी
मुळशी 58.17 मिमी

तालुके व पाऊस
पुणे शहर 12.65 मिमी
हवेली 11.30 मिमी
मुळशी 58.17 मिमी
भोर 21.50 मिमी
मावळ 77.37 मिमी
वेल्हा 68.50 मिमी
जुन्नर 18.11 मिमी
खेड 20.78 मिमी
आंबेगाव 8.40 मिमी
शिरूर 5.56 मिमी
बारामती 1.38 मिमी
इंदापूर 0.63 मिमी
दौंड 4.13 मिमी
पुरंदर 6.57 मिमी

फक्त तीनच तालुक्यांत चांगला पाऊस
राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडत असताना मात्र पुणे जिल्ह्यात अजूनही फारसा चांगला पाऊस झालेला नाही. विभागीय आयुक्तालयाने 7 जुलै रोजीची आकडेवारी जाहीर केली. मावळ, वेल्हा, मुळशी या तीनच तालुक्यांत सरासरी 50 मि.मीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. बाकीचे सर्वच तालुके अजूनही सरासरीत नापासच्या यादीत आहेत.

जिल्ह्यातील कमी पावसाचे तालुके
जिल्ह्यातील काही तालुके अजूनही कमी पावसाचे आहेत. यात प्रामुख्याने बारामती तालुक्यात (सरासरी 1.38 मि.मी.) पाऊस झाला आहे. त्यानंतर इंदापूर तालुक्यात सरासरी 0.63 मि.मी., दौंड तालुक्यात 4.13 मि.मी., पुरंदर तालुक्यात 6.57 मि.मी., जुन्नर 18.11 मि.मी. खेड 20.78 मि.मी., आंबेगाव 8.4 मि.मी., शिरुर 5.56 मि.मी., हवेली 11.30 मि.मी., भोर 21.50 मि.मी., शिरुर 5.56 मि.मी. इतका कमी पाऊस झाला आहे.

Back to top button