पुणे

मोबाईल कंपनीचे ’लाइन कार्ड’ मशिन चोरणारे गजाआड..!

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मोबाईल कंपनीकडून 5जी स्पीड देण्यासाठी बसविण्यात आलेले 54 लाखांचे 'लाइन कार्ड' मशिन चोरून ते खडकवासला व्हाया दिल्ली विकण्यात आल्याचा प्रकार स्वारगेट पोलिसांनी उघडकीस आणला आहे. ही चोरी सुरक्षारक्षक आणि कंपनीचा टेक्निसियन असलेल्या दोघांनीच केली होती. पोलिसांनी बंगळुरूमधून हे मशिन जप्त केले असून, तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. भरमुबिरप्पा पुजारी (वय 39, रा. कात्रज), दीपक मुरलीधर तडके (वय 48, रा. येरवडा) आणि प्रीतमकुमार कामताप्रसाद कमल (वय 32) यांना अटक केली आहे.

याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ही कारवाई परिमंडळ दोनच्या उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त नंदिनी वग्यानी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक दिलीप फुलपगारे, उपनिरीक्षक अशोक येवले, कर्मचारी संदीप घुले, अनिस शेख, सोमनाथ कांबळे, शिवा गायकवाड, फिरोज शेख, रमेश चव्हाण, प्रवीण गोडसे, दीपक खेंदाड त्यांच्या पथकाने केली आहे.
स्वारगेट चौकात वेगा सेंटर आहे. या सेंटरमध्ये नामांकित मोबाईल कंपनीचे कार्यालय आहे. या ठिकाणी इंटरनेटची सुविधा देणार्‍या काही मशिनदेखील आहेत. दरम्यान, भरमुबिरप्पा पुजारी हा या ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. तर, दीपक तडके हा टेक्निसियन आहे. 11 मार्च रोजी कार्यालयात बसविलेले 54 लाखांचे लाइन कार्ड मशिन चोरीला गेले होते. परंतु, कंपनीकडून गेल्या तीन दिवसांपर्यंत चोरीबाबतची तक्रार दिली नव्हती. मात्र, तीन दिवसांपूर्वी पोलिसांकडे मशिन चोरी झाल्याबाबत तक्रार देण्यात आली. पोलिसांनी गुन्हा नोंद करत तपास सुरू केला.

वरिष्ठ निरीक्षक दिलीप फुलपगारे यांच्या सूचनेनुसार पथकाने तांत्रिक तपास व सीसीटीव्हीची पाहणी केली. तसेच, कंपनीच्या काही कामगारांकडेही चौकशी केली. त्यावरून पुजारी व तडके यांना ताब्यात घेत चौकशी केली. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. अधिक चौकशीत त्यांनी हे मशिन प्रीतमकुमार याला विक्री केल्याचे समोर आले. पोलिसांनी प्रीतमकुमार याला अटक केली असता त्याने हे मशिन दिल्लीत विकल्याचे सांगितले. पोलिसांनी दिल्लीत धाव घेतली असता हे मशिन दिल्लीतून पुढे बंगळुरू व इंदूर या ठिकाणी गेल्याची माहिती मिळाली. परंतु, पोलिसांनी विशेष प्रयत्न करत हे मशिन पुन्हा दिल्लीत आणत तेी जप्त केली आहे. केवळ तीन दिवसांत पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला आहे.

भंगारमध्ये विक्री

पुजारी व तडके यांनी हे मशिन केवळ दोन लाख रुपयांत प्रीतम याला विकले. प्रीतमने हेच मशिन दिल्लीत एका मोठ्या भंगारच्या दुकानात साडेचार लाख रुपयांना विकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. भंगार व्यावसायिकानेही हे मशिन पुढे मोठ्या किमतीत विकल्याची माहिती आहे.

लाइन कार्ड म्हणजे काय?

मोबाईलसह इतर कंपन्यांनी नुकतेच 5 जी स्पीड देण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार हे मशिन मोबाईल कंपनीच्या कार्यालयात बसविले गेले होते. या मशिनद्वारे 5 जी स्पीड मिळते. हे मशिन दहा ते बारा इंच लांब व सात ते आठ इंच रुंदीचे असते. ते एका ठिकाणी बसविले जाते. या मशिनची 54 लाख रुपये किंमत आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT