बालनाटकांच्या प्रयोगांसाठी मिळेनात नाट्यगृहे : तारखा मिळवण्यासाठी करावी लागते कसरत | पुढारी

बालनाटकांच्या प्रयोगांसाठी मिळेनात नाट्यगृहे : तारखा मिळवण्यासाठी करावी लागते कसरत

सुवर्णा चव्हाण

पुणे : उन्हाळी सुटी लागल्यामुळे बालरंगभूमीवर बालनाटकांचे प्रयोग सुरू झाले आहेत. पण, एप्रिल आणि मे महिना बालनाट्यांचा आनंद घेण्याचा काळ असला, तरी यंदा तुलनेने बालनाट्य प्रयोगांची संख्या घटली आहे. त्याचे कारण म्हणजे नाट्य संस्थांना बालनाट्यांच्या प्रयोगांसाठी महापालिकेच्या नाट्यगृहांसह खासगी नाट्यगृहांच्या तारखा मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
लोकसभा निवडणुकांचे कार्यक्रम, विकेंडला नाट्यगृहांमध्ये असलेले व्यावसायिक नाटकांचे बुकिंग, अशा विविध कारणांमुळे बालनाटकांचे प्रयोग करणे आत्ताच्या घडीला नाट्य संस्थांना अडचणीचे होत आहे. सोमवार ते शुक्रवार या दिवशी नाट्यप्रयोग करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने बालनाटकांच्या प्रयोगांची संख्या यंदा कमी झाल्याचे चित्र दिसत आहे.

उन्हाळी सुटी लागली की बालनाटकांच्या प्रयोगांना सुरुवात होते. बालरंगभूमीवरील दर्जेदार बालनाटकांना दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळतो. पण, गेल्या तीन वर्षांपासून नाट्य संस्थांना शनिवारी आणि रविवारी नाट्यगृहांचे बुकिंग करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. यंदाही हीच परिस्थिती असून, काही नाट्य संस्थांचे प्रतिनिधी तर तारखा मिळविण्यासाठी महिनाभरापासून प्रयत्न करीत आहेत. पण, काही ठिकाणी नकार मिळत आहे. मे महिन्यात तरी नाट्यगृहांच्या तारखा मिळाव्यात, अशी अपेक्षा नाट्य संस्थांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे. गुरुस्कूल गुफानचे अध्यक्ष प्रा. देवदत्त पाठक म्हणाले, बालनाट्यांचे प्रयोग करणे सध्याच्या घडीला अडचणीचे होत आहे. खासगी नाट्यगृहांचे भाडे प्रयोगांसाठी परवडणारे नाही.

विकेंडला नाट्यगृहांच्या तारखा मिळत नसल्याने इतर दिवशी प्रयोग करणे आर्थिकदृष्ट्या नुकसानीचे होत आहे. पालकांना सुट्या तर शनिवारी-रविवारी असतात, त्याच वेळेला मुलांना घेऊन पालक नाट्यगृहात येऊ शकतात. पण, नाट्यगृह तर शनिवारी-रविवारी मिळतच नाहीत, इतर दिवशी पालक मुलांना नाटकांसाठी घेऊन येऊ शकत नाहीत. त्यामुळे बच्चेकंपनी प्रयोग बघायला येऊ शकत नाहीत.
अशामुळे बालनाटकांचे प्रयोग आम्ही करणार तरी कसे? हा प्रश्न आहे. एका नाट्य संस्थेचे संचालक संतोष माकुडे म्हणाले, आम्ही बुकिंगसाठी खूप फिरलो. पण, विकेंडला व्यावसायिक नाटकांच्या प्रयोगांचे बुकिंग असल्याने आम्हाला काही ठिकाणी नकार मिळाला. तरीही आम्ही प्रयत्न करीत आहोत. सध्या बालनाटकांना विकेंडला नाट्यगृहांच्या तारखाच मिळत नसून, नाट्यगृहांच्या तारख्या मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

पालकांना जर विकेंडलाच सुटी असेल तर इतर दिवशी प्रयोग करून नाट्य संस्था करणार काय? असा प्रश्न पडतो. व्यावसायिक नाटकांप्रमाणेच नाट्यगृहांचे भाडे, जाहिरातदर, इतर खर्च असा खर्च बालनाटक करणार्‍या नाट्य संस्थांना करावा लागत आहे. पण, पालकांसह मुलांनी बालनाटकांना यावे, यासाठी बालनाटकांचे तिकिटाचे दरही कमी ठेवावे लागतात. त्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागते.

– प्रकाश पारखी, अध्यक्ष, नाट्य संस्कार कला अकादमी

हेही वाचा

Back to top button