पुणे

महिलांना मिळणार सवलतीत उपचार; लोकमान्य रुग्णालयात महिलांसाठी क्लिनिक

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुण्यातील लोकमान्य रुग्णालय आणि लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने खास महिलांसाठी वुमन सुपर स्पेशालिटी क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. अनेकदा महिला स्वतःच्या तब्येतीचा विचार करीत नाहीत. अशावेळी आजार बळावल्यास जिवावर बेतू शकते. म्हणूनच महिलांच्या आरोग्य समस्या लक्षात घेता वेळीच निदान व उपचार व्हावेत, यादृष्टीने या क्लिनिकमध्ये महिलांना सवलतीच्या दरात उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मंगळवारी (दि.31) डॉ. तारिता शंकर यांच्या हस्ते या क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी पोलिस उपअधीक्षक अनुजा देशमाने, जनरल प्रँक्टीशनर्स असोशिएशनच्या सचिव डॉ. शुभदा जोशी, लोकमान्य रूग्णालयाचे संचालक डॉ. नरेंद्र वैद्य, डॉ. मिताली वैद्य आदी उपस्थित होते.

स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मिता नखरे म्हणाल्या, 'महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या या सुपर स्पेशालिटी क्लिनिकचा भाग बनून मला खूप आनंद होत आहे. महिलांना त्यांच्या स्वत:च्या आरोग्याची जबाबदारी घेण्यास सक्षम बनवणे, हे आमचे ध्येय आहे. या क्लिनिकद्वारे महिलांना एकाच छताखाली सर्व उपचारांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कोणत्याही चाचण्या घेण्याआधी रुग्णांना समुपदेशन केले जाते, रुग्णांना आरामदायी वाटावे आणि उच्च पातळीची गोपनीयता राखण्यासाठी कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले जाते.'

महिलांशी संबंधित सर्व एकाच ठिकाणी…

महिलांशी संबंधित समस्या, रक्त चाचणी, गर्भाशयाचे आजार, थायरॉईड टेस्ट, पॅप स्मीयर, वंधत्व तपासणी, संधिवाताची समस्या, मानसिक आजार, महिलांमधील कॅन्सर, प्रजननाशी संबंधीत समस्या यावर एकाच छताखाली उपचार उपलब्ध करून देण्यात येत आहेत. विशेषत: महिलांवर हे उपचार सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येत आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT