पुणे

मच्छरमार अगरबत्ती वापरताय? सावधान!

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

'आपण घरात मच्छरमार अगरबत्ती लावत असाल तर सावधान… कारण, शंभर सिगारेट जाळल्यावर जेवढा धूर निघतो, तेवढा धूर मच्छरमारच्या एका कॉईलमधून निघतो. यातून सर्वाधिक प्रमाणात अतिसूक्ष्म धूलिकण 2.2 निघतात,' अशी माहिती शहरातील श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. स्वप्नील कुलकर्णी यांनी दिली.

परिसर संस्थेच्या वतीने वायू प्रदूषणावर पत्रकार संघात एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात देशभरातील वायू प्रदूषण विषयावर काम करणारे तज्ज्ञ आले होते. या वेळी कुलकर्णी यांचे स्लाईड शोव्दारे सादरीकरण झाले. ते म्हणाले, 'आपण घरात डास येऊ नयेत म्हणून दारे, खिडक्या लावून मच्छरमार अगरबत्ती लावतो. मात्र, तसे कधीही करू नये. ही अगरबत्ती दारे, खिडक्या उघडी ठेवूनच लावली पाहिजे.'  'आपल्या नाकात फिल्टर असते; पण ते 10 मायक्रो ग्रॅमपेक्षा मोठ्या आकाराचे धूलिकण अडवू शकतात. त्यापेक्षा बारीक 2.5 व त्यापेक्षा कमी आकाराचे धूलिकण फुप्फुसात जातात. तेथून ते रक्तात मिसळतात. त्यामुळे शरीराच्या सर्व अवयवांत पोहोचतात. त्यामुळे वायुप्रदूषण सर्वांत घातक आहे,' असेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

100 सिगारेटचा धूर एका कॉईलमध्ये

डॉ. कुलकर्णी यांनी या वेळी स्लाईड शोद्वारे आकडेवारी सादर केली. ते म्हणाले, 'वायू प्रदूषणाचा परिणाम लहान मुले, गर्भवती, वयोवृध्द आणि आजारी व्यक्तींवर जास्त होतो. साधी मच्छरमार उदबत्ती लावली, तर त्यात 2.5 या प्रकारातील अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण जास्त असते. त्यात आपण घराची दारे व खिडक्या लावल्या, तर हे सूक्ष्म धूलिकण फुप्फुसात जातात व संपूर्ण शरीरावर दुष्परिणाम करतात.'

खूप रहदारी असलेल्या ठिकाणी कायम मास्क वापरा

कोरोनामुळे जगात 60 लाख लोकांचे बळी गेले. मात्र, जगात दरवर्षी वायू प्रदूषणामुळे 70 लाख लोकांचा मृत्यू होतो. युद्धात 25 हजार, अपघाताने 15 लाख मृत्यू असे प्रमाण आहे. अल्झायमर, पार्किन्सन्स, दमा, अस्थमा, फुप्फुसाचे विविध आजार वायू प्रदूषणामुळे होतात. सतत चिडचिड होणे हेदेखील वायू प्रदूषणामुळे होते, असेही त्यांनी सादरीकरणात सांगितले.

त्वचेवर सर्वांत लवकर दिसतो परिणाम

सूक्ष्म धूलिकण नाकावाटे फुप्फुसात जातात. तेथून रक्तात गेल्यावर पहिला परिणाम दिसतो तो तुमच्या त्वचेवर. वायू प्रदूषणामुळे त्वचेचे विविध विकार होतात; तसेच किडनी, हृदय, यकृताचे आजारही जडू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT