पुणे

भूमिगत वीजवाहिन्या ही जबाबदारी महावितरणची; पावसाळी कामांबाबत महापालिकेचे स्पष्टीकरण

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

'शहरातील इतर वीजवाहिन्या भूमिगत करण्याची संपूर्ण जबाबदारी महावितरणचीच आहे,' असे स्पष्टीकरण महापालिकेने दिले आहे.
'रस्ते किंवा प्रकल्पाला अडथळा ठरणारे विद्युत पोल काढून तेथील वीजवाहिन्या भूमिगत करण्याचे काम महापालिकेकडून केले जाते,' असे सांगण्यात आले.

पावसाळ्यात वाहिन्यांमध्ये पाणी शिरते आणि त्यात बिघाड होऊन विद्युतपुरवठा खंडित होतो. शिवाय झाडे व फांद्या कोसळूनही विद्युतपुरवठा खंडित होतो. या पार्श्वभूमीवर वीजवाहिन्या आणि विद्युत पोलचे जाळे कमी करून सुरक्षित वीजपुरवठा करण्यासाठी महावितरण वीज कंपनीने गेल्या काही वर्षांपासून वीजवाहिन्या भूमिगत करण्याचे काम हाती घेतले आहे. केबल टेस्टिंग व्हॅनच्या साहाय्याने भूमिगत वाहिन्यांमधील दोष शोधला जातो. आतापर्यंत पुणे शहरातील 58 टक्के वीजवाहिन्या भूमिगत करण्याचे काम केले आहे.

विद्युतवाहिन्या भूमिगत करण्याचे काम धीम्या गतीने सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या अधिकार्‍यांना विचारले असता, त्यांनी महापालिकेकडे बोट दाखवले. स्थानिक लोकप्रतिनिधीच्या फंडातून महापालिकेला वीजवाहिन्या भूमिगत करावयाच्या असतील, तर त्यास मंजुरी देऊ असे अधिकार्‍यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल यांनी पालिकेची भूमिका स्पष्ट केली आहे. रस्ते किंवा प्रकल्पाला अडथळा ठरणारे विद्युत पोल काढून तेथील वीजवाहिन्या भूमिगत करण्याचे काम महापालिकेकडून केले जाते. मात्र, शहरातील इतर वीजवाहिन्या भूमिगत करण्याची संपूर्ण जबाबदारी महावितरणचीच आहे. विद्युत विभाग स्वतःहून कोठेही वीजवाहिन्या भूमिगत करत नाही, असे कंदुल यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT