पुणे

बेट भागातील शेतकर्‍यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा

अमृता चौगुले

पिंपरखेड, पुढारी वृत्तसेवा: शिरूर तालुक्यातील बेट भागात मृग नक्षत्रातील पावसाने अपेक्षित हजेरी लावलेली नाही. अल्प पावसावर पेरणी केलेल्या व पुरेशा पावसाअभावी पेरणी न केलेल्या अशा सर्वच शेतकर्‍यांना जोरदार पावसाची अपेक्षा आहे. ऐन पावसाळ्यात शेतकर्‍यांना खरीप पिकांना सिंचनाची वेळ आली आहे.

राज्यात मान्सूनच्या आगमनाच्या बातमीने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मान्सूनने कोकण, मुंबई, विदर्भात प्रवेश केला असला तरी वेग मंदावल्याने पुणे जिल्ह्यात सक्रिय झाला नसल्याचे चित्र आहे. मान्सूनपूर्व पावसाने काही भागात तुरळक हजेरी लावत विश्रांती घेतल्याने सध्या कडक उन्हाचा चटका बसत आहे. खरिपातील पिकांना पाणी देण्याची वेळ आल्याचे चित्र बेट भागात पाहायला मिळत आहे.

बेट भागात शेतकर्‍यांकडून मोठ्या प्रमाणात उसाचे पीक घेतले जाते. अनेक शेतकर्‍यांनी मे महिन्यातच ऊस लागवड केली आहे. पूूर्व मान्सूनने काही गावात समाधानकारक हजेरी लावली असली तरी काही भागात अपेक्षित हजेरी लावली नाही. आता मृग नक्षत्रातील पावसानेही हुुलकावणी दिली आहे. अद्यापही अनेक शेतकरी वरुणराजाच्या जोरदार हजेरीसाठी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत.

जून महिना अर्धा संपला तरी वरुणराजाने अपेक्षित हजेरी न लावल्याने बेट भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. काही भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावून विश्रांती घेतल्याने शेतकर्‍यांचे पिकांचे नियोजनही कोलमडले आहे. सध्या दिवसभर वारे आणि ऊन-सावलीचा खेळ सुरू असल्याने पिके कोमेजण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT