पुणे : पुढारी वृत्तसेवा: शहरातून महागड्या गाड्या चोरल्यानंतर त्यांची विल्हेवाट लावेपर्यंत चोरटे प्रत्येक टप्प्यावर काळजी घेत होते. मात्र, त्यांची एक चूक पोलिसांच्या नजरेत आली आणि दोघे जेरबंद झाले. टोलनाक्यावर वापरलेल्या फास्टॅगच्या आधारे पोलिसांनी त्यांना अटक केली. अनिलकुमार (रा. बंगळुरू, कर्नाटक) आणि गोपीनाथ जी. (रा. चेन्नई, तमिळनाडू) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
दोघेही उच्चशिक्षित असून चोरीत हायटेक असल्याचे पोलिसांनी सांंगितले. फास्टॅगवरून चोरी उघडकीस आणण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. पर्वती येथील लक्ष्मीनगरमध्ये राहणारे सुरेंद्र वीर यांची महागडी कार 5 जूनला चोरीला गेली होती. दत्तवाडी पोलिसांनी या गाडीचे 200 ते 250 अस्पष्ट फुटेज पर्वतीपासून सातार्यापर्यंत तपासले. या गाडीबरोबरच मागोमाग एक दुसरी कार कायम दिसत होती.
मात्र, टोलनाक्यावर ही चोरलेली कार दिसून आली नाही. पोलिस कर्मचारी पुरुषोत्तम गुन्ला व प्रमोद भोसले यांनी खेड शिवापूर व आणेवाडी येथे टॅग झालेला, पण वेगवेगळा गाडी नंबर असलेला कॉमन टॅग 60 ते 70 हजार गाड्यांमधून शोधून काढला. त्याबद्दल संशय आल्यामुळे टोलनाक्यावर हा फास्टॅग पुन्हा आला तर तेथील कर्मचार्यांना सतर्क करण्यास सांगितले.
त्यानुसार आणेवाडी येथील टोलनाक्यावर हा फास्टॅग वापरला गेल्याचे पोलिसांना 14 जून रोजी सांगण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. तमिळनाडूमधून 20 लाख 57 हजार रुपयांची कार जप्त करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन, निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, चंद्रकांत कामठे, हवालदार कुंदन शिंदे, प्रकाश मरगजे, अमित सुर्वे, नवनाथ भोसले, किशोर वळे, अमित चिव्हे, अमोल दबडे यांनी ही कारवाई केली.
दोघे चोरटे 'हायटेक'
अनिलकुमार हा उच्च शिक्षित असून गाडीच्या तांत्रिक ज्ञानाची त्याला पुरेपूर माहिती आहे. डिजिटल चावी बनविणारे क्लोन डिव्हाईस (मशिन) व प्रोग्रॅमिंग करून तो महागड्या गाड्या चोरत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर कोईम्बतूरमध्येसुद्धा गुन्हे दाखल आहेत. गाडी चोरल्यानंतर ते काही अंतर गेल्यावर तिची नंबर प्लेट बदलत असत. दोन टोलनाक्यांच्या दरम्यान पुन्हा नंबर प्लेट बदलत. तसेच गाडी चोरताना सुरवातीला गाडीची काच फोडून तिची क्लोन चावी तयार करत होते. त्यामुळे सेन्सरचा आवाज होत नसे. दरम्यान, प्रत्येक वेळी एक गाडी चोरून नेण्याचे नियोजन करत होते. चोरी केलेल्या गाडीवर चोरटे फुली मारत होते.
हेही वाचा