कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : शहरातील बाबुजमाल परिसरात धोकादायक इमारतीची भिंत कारवर कोसळली. यात कारचे मोठे नुकसान झाले. इमारत मालकांनी महापालिकेला कळविल्यानंतर कर्मचार्यांनी धोकादायक इमारतीचा भाग उतरविला.
महापालिकेच्या वतीने बाबुजमाल येथील सि.स.नं. 3216-1/2 प्रकाश सदाशिव भालेकर व इतर 11 जणांच्या संयुक्त इमारतीचा धोकादायक भाग सोमवारी उतरविण्यात आला. इमारतीचा काही भाग सकाळी पडल्याने संबंधित मालकाने धोकादायक इमारतीचा भाग उतरविण्याबाबत महापालिकेकडे लेखी अर्ज दिला होता. त्याप्रमाणे रहदारीचा व वाहतुकीचा रस्ता असल्याने तातडीने धोकादायक भाग उतरवून घेतला.
शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय कार्यालय क्रं.2 च्या वतीने ही कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई 1 जेसीबी, अग्निशमन वाहन व 25 कर्मचार्यांच्या सहाय्याने करण्यात आली. यावेळी कनिष्ठ अभियंता निवास पोवार, उपमुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे व कर्मचारी उपस्थित होते.