पुणे

प्रवासी कंपनीला दणका; व्हिसासाठी अर्ज न देणे भोवले

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

धर्मस्थळांच्या यात्रेसाठी आठ प्रवाशांकडून एकूण तीन लाख तीस हजार रुपये स्वीकारून, त्यांच्या व्हिसासाठी अर्ज न करणार्‍या सहल कंपनीने यात्रेच्या बुकिंगसाठी घेतलेली संपूर्ण रक्कम वार्षिक आठ टक्के व्याजासहित प्रवाशाला परत करण्याचे आदेश ग्राहक आयोगाने सहल कंपनीला दिले.

पुण्याच्या अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष जयंत देशमुख, सदस्य अनिल जवळेकर व शुभांगी दुनाखे यांनी हा निकाल दिला. याबाबत तन्वीर अख्तर मन्सूर पठाण (रा. कोंढवा खुर्द) यांनी इब—ाहिम दाफेदार यांच्या 'आरफाह टूर्स अँड ट्रॅव्हल्स' विरोधात ग्राहक आयोगात दाद मागितली होती.

'आरफाह' कंपनीकडून हज, मक्का, मदिना, उमराह या धार्मिक स्थळांवर यात्रेचे नियोजन केले जाते. पठाण यांना कुटुंबातील सात व्यक्तींसोबत मक्का व मदिना येथे धार्मिक विधीला जायचे होते. त्यासाठी त्यांनी या सहल कंपनीचे पॅकेज घेतले. तक्रारदारांच्या विमान प्रवासाचे तिकीट बंगळुरू ते जेदाह असे होते.

तक्रारदारांनी प्रवासासाठीची संपूर्ण रक्कम म्हणून तीन लाख तीस हजार रुपये भरले. कंपनीने त्यांना वेगळ्या नावाने दोन वेळा 'रिझर्व्हेशन स्लीप' दिली. यात्रा 25 डिसेंबर 2019 पासून सुरू होणार असल्यामुळे तक्रारदारांकडून व्हिसाबाबत कंपनीकडे विचारणा केली. परंतु, कंपनीकडून काळजी करू नका, असे सांगण्यात आले.

तक्रारदारांनी सौदी अरेबिया सरकारच्या संकेतस्थळावर तपासणी केली असता, सहल कंपनीने तक्रारदारांच्या नावे व्हिसासाठी अर्जच केला नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तक्रारदारांनी कंपनीकडून प्रवासासाठीची संपूर्ण रक्कम परत मागितली. मात्र, कंपनीने त्यांची आश्वासनावर बोळवण करत प्रत्यक्षात रक्कम परत केली नाही. त्यामुळे तक्रारदारांनी ग्राहक आयोगात धाव घेतली होती.

यात्रा बुकिंगची रक्कम व्याजासहित 45 दिवसांत परत न केल्यास त्यावर वार्षिक दहा टक्के व्याज आकारण्यात येईल, प्रवाशाला सदोष ग्राहक सेवा दिल्याबद्दल भरपाई आणि तक्रार खर्चापोटी तीस हजार रुपये द्यावेत, असे आदेशही आयोगाने सहल कंपनीला दिले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT