पुणे

पुनर्विवाहाची इच्छा पडली महागात; शिक्षिकेची आठ लाखांची फसवणूक

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पतीनिधनानंतर पुनर्विवाह करण्याच्या हेतूने एका शिक्षक महिलेने शादी डॉट कॉम या संकेतस्थळावर नाव नोंदविले होते. तेथेच ओळख झालेल्या तोतयाने करन्सी बदलासाठी 8 लाख 10 हजार भरण्यास सांगून फसवणूक केली. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशीलकुमार दुबे (रा. पश्चिम दिल्ली) आणि विजया रिखेश्वर चेतिया (रा. आसाम) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका 39 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. या शिक्षिका असलेल्या महिलेच्या पतीनिधनानंतर तिच्या घरचे दुसरा जोडीदार शोधत होते. त्या दृष्टीने फिर्यादीची नावनोंदणी शादी डॉट कॉम या वेबसाईटवर त्यांनी केली होती. तेथेच त्या महिलेची ओळख गॉडवीन नावाच्या व्यक्तीशी झाली. त्याने आपण लंडन येथे राहत असल्याची बतावणी करत महिलेसोबत संभाषण वाढवले. यातून त्यांची लग्नाची बोलणी सुरू होत असताना त्याने तिला 8 फेब्रुवारी रोजी फोन करून लंडन येथून दिल्ली एअरपोर्ट येथे आल्याचे सांगितले.

त्याच्याकडे डॉलर्स हे विदेशी चलन असून, ते चलन भारतीय चलनात बदलून घेण्यासाठी खात्यावर 8 लाख 10 हजार रुपये पाठविण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने त्याला पैसे पाठवले. फिर्यादीला फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी हे प्रकरण कोंढवा पोलिस ठाण्यात दाखल करण्यासाठी पाठविले. सहायक पोलिस निरीक्षक संदीप मधाळे यांनी हा गुन्हा दाखल केला.

'एनी डेस्क'चा वापर करून महिलेला गंडा

एनी डेस्क अ‍ॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडून सायबर चोरट्यांनी महिलेच्या खात्यावरून 33 हजार काढून याच आधारे महिलेच्या नावाने 3 लाखांचे कर्ज काढून त्यातील पावणेतीन लाख घेऊन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात 28 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार, अनोळखी मोबाईलधारक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार या आंबेगाव बुद्रुक परिसरात राहण्यास आहेत. त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. तसेच, त्याने एका बँकेच्या क्रेडिट विभागातून बोलत असल्याची माहिती दिली.

त्यांना बँक खात्याची अडचण विचारली. तक्रारदारांनी अडचण सांगितली. त्यावेळी आरोपीने त्यांना एनी डेस्क हे अ‍ॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यास भाग पाडले. त्यांनी अ‍ॅप डाऊनलोड करताच त्यांच्या मोबाईलचा अ‍ॅक्सेस घेऊन त्यांच्या खात्यातील 33 हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर त्यांच्या नावाने 3 लाख 3 हजार 598 रुपये पर्सनल कर्ज काढले. तसेच, त्यातील 2 लाख 76 हजार 325 रुपये काढून घेऊन फसवणूक केली. अधिक तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT