सातारा : विधवा पुनर्विवाहासाठी 25 हजारांची भेट; आदर्श बनवडी ग्रामपंचायतीचा निर्णय | पुढारी

सातारा : विधवा पुनर्विवाहासाठी 25 हजारांची भेट; आदर्श बनवडी ग्रामपंचायतीचा निर्णय

कोपर्डे हवेली : जयवंत नलवडे
‘स्वच्छ व सुंदर’ म्हणून राज्यात चमकलेल्या कराड तालुक्यातील आदर्श बनवडी ग्रामपंचायतीने शुक्रवारी विशेष महिला सभेत विधवा पुनर्विवाहास प्रोत्साहन म्हणून 25 हजार रूपयांची भेट देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. एवढ्यावरच न थांबता ग्रामसभेत विधवा प्रथा बंदीचा एकमुखी ठराव करून विधवा महिलांना हिरव्या बांगड्या भरल्या. शिवाय हळदी -कुंकवाचा कार्यक्रम झाला. मिळालेला मान-सन्मान पाहून महिला गहिवरल्या. ग्रामपंचायतीचा हा क्रांतिकारी निर्णय राज्याला दिशा देणारा ठरणार आहे.

यावेळी सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच विकास करांडे, सदस्य पांडुरंग कोठावळे, अख्तर आतार, पल्लवी साळुंखे, भाऊसाहेब घाडगे, संपतराव माळी,अलका पाटील,कमल म्हेत्रे, स्वाती गोतपागर, ग्रामसेवक दीपक हिनुकले आदींची उपस्थिती होती. समाजातील अनिष्ठ रुढी परंपरा मोडीत काढण्यासाठी बनवडी ग्रामपंचायतीने पुढचे पाऊल टाकले आहे. विधवा महिलांना समाजात दुय्यम स्थान दिले जाते. हे ओळखून ग्रामपंचायतीने महिला सभा बोलावून हा क्रांतिकारी निर्णय घेतला. विधवा महिलेचा पुनर्विवाह करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पंचवीस हजार रुपये मदत केली जाणार आहे. टाळ्यांच्या कडकडाटात या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. यावेळी महिलांना हिरव्या बांगड्या भरण्यात आल्या. तसेच हळदी-कुंकवाचा कार्यक्रम झाला.

यावेळी विधवा महिलांनी जीवन जगत असताना येणार्‍या अडीअडचणी व व्यथा मांडल्या. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. माधवी करांडे म्हणाल्या, समाजाला बदल हवा आहे. परंतु पुढाकार घेणे आवश्यक आहे. समाजाने अनेक निर्बंध लादले आहेत. अशा महिलांना दुय्यम वागणूक दिली जाते. हे टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने घेतलेला निर्णय महत्त्वपूर्ण व दिशा देणार आहे. कोरोना काळात अनेक तरुण मुली विधवा झाल्या. आज त्यांची परवड होत आहे. महिलांनीच अशा महिलांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. विधवा होणे हा तिचा दोष नाही. तिला भविष्यात येणार्‍या अडचणींना तोंड देण्यासाठी समाजाने तिला हिम्मत दिली पाहिजे. दीपक हिनुकले यांनी प्रास्ताविक केले. आभार ग्रा.पं.सदस्य पल्लवी साळुंखे यांनी मानले.

बनवडी राज्यातील पहिली ग्रामपंचायत

राजमाता जिजाऊ पुण्यतिथी निमित्त छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांची प्रेरणा घेऊन पुनर्विवाह करणार्‍या महिलेस पंचवीस हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय सरपंच प्रदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच विकास करांडे यांनी जाहीर केला. विधवा विवाहाचा क्रांतिकारी निर्णय घेणारी बनवडी ग्रामपंचायत राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.

Back to top button