पुणे

पुणे : बेट भागातील खतविक्री केंद्रांवर कारवाई

अमृता चौगुले

टाकळी हाजी : पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी व मलठण येथील पाच खत विक्री केंद्रांवर कृषी विभागाकडून कारवाई केली आहे. तब्बल 8 केंद्रांवर परवाना निलंबन व सक्त ताकदीच्या कारवाया केल्याचे तालुका कृषी अधिकारी अमित रणवरे यांनी सांगितले.

टाकळी हाजी येथील 3 खत विक्री केंद्रांचे परवाने 5 दिवसाकरिता निलंबित केले असून, 1 खत विक्री केंद्रास सक्त ताकीद दिली आहे. मलठण येथील एका केंद्राचा परवाना 7 दिवसांसाठी व एका केंद्राचा परवाना 5 दिवसांकरिता निलंबित केला असून, 2 खत विक्री केंद्रांना सक्त ताकीद दिल्याचेही रणवरे यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी कृषी विभागाच्या भरारी पथकाने अचानक या भागातील दुकानांची तपासणी केली होती. त्यामध्ये दोषी आढळून आलेल्या दुकानदारांना चौकशीला सामोरे जावे लागले होते. परंतु, कारवाई मात्र ठराविकच दुकानदारांवर. इतरांबरोबर अर्थपूर्ण तडजोड तर झाली नाही ना, अशी शंका दुकानदारांकडून उपस्थित होत आहे.

पर्यायी व्यवस्था नसल्याने शेतकर्‍यांची कुचंबणा

दुसरीकडे ज्या दुकानदारांवर कारर्वाइ झाली त्यांच्याकडे उधारीचे खाते असलेल्या शेतकर्‍यांची गोची झाली आहे. खते खरेदीसाठी कोणती पर्यायी व्यवस्था केली आहे, हे समजू न शकल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. कंपनीकडून दुकानदारांना लिंकिंग खते घेण्याची अट असल्यामुळे दुकानदार युरिया खरेदीसाठी तयार नाहीत. पण, इतर चौकशीमुळे जखम मांडीला आणि उपचार शेंडीला, अशीच काहीशी कृषी विभागाची असल्याची चर्चा होत आहे.

SCROLL FOR NEXT