पुणे

पुणे : पाण्याचे कनेक्शन देण्यासाठी लाच घेणारा पालिकेचा ठेकेदार अटकेत

निलेश पोतदार

पुणे ; पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या सहायक आणि कनिष्ठ अभियंत्याला पैसे द्यावे लागतात सांगत, पाणी कनेक्शन देण्यासाठी ठेकेदाराने 30 हजारांच्या लाचेची मागणी केली. यात 17 हजारांची लाच स्विकारणार्‍या ठेकेदाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. महेश तानाजी शिंदे (वय 46) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबात एका (54 वर्षीय) तक्रारदाराने फिर्याद दिली आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांना त्यांच्या मिळकतीमध्ये पाण्याचे कनेक्शन घ्यायचे होते. त्यासाठी त्यांनी चतुःश्रृंगी पाणी पुरवठा विभागात अर्ज केला होता. हे पाणी कनेक्शन मिळवून देण्यासाठी महेश शिंदे हा त्यांच्याकडे 30 हजारांची लाच मागत होता. त्यातील 15 हजार शिंदे याने घेतले व आणखी 15 हजार रूपयांची मागणी केल्याची तक्रार त्यांनी एसीबीकडे दिली होती.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर तक्रारदार यांचे पाणी कनेक्शन मिळवून देण्यासाठी महेश शिंदे याने पालिकेच्या सहायक अभियंता व कनिष्ठ अभियंता यांना पैसे द्यावे लागतात असे सांगण्यात आले. पाणी कनेक्शनसाठी 15 हजारांची लाच तर प्लंबींगच्या कामासाठी 2 हजार रूपये असे 17 हजारांची लाच स्विकारल्या प्रकरणी अटक करण्यात आल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त श्रीहरी पाटील यांनी सांगितले. एसीबीचे अधीक्षक राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गुन्ह्याचा तपास निरीक्षक प्रणेता सांगोलकर करीत आहेत.

SCROLL FOR NEXT