पुणे

पुणे : दख्खनच्या राणीचा रूबाब उतरला ! चाकरमानी वैतागले

अमृता चौगुले

पुणे : डेक्कन क्वीन म्हणजेच दख्खनच्या राणीचा दिमाख आणि रुबाब काही औरच. ही राणी सकाळी सव्वासातला पुण्याहून निघाली की बाकीच्या गाड्या बाजूला ठेवल्या जात अन् ठीक दहा वाजून वीस मिनिटांनी ती व्हीटीला म्हणजेच आताच्या छत्रपती शिवाजीमहाराज टर्मनिसला पोहोचे. कार्यालयीन वेळेत मुंबई गाठण्यासाठी अत्यंत सोयीची ही गाडी. मात्र आता या गाडीची रया गेली असून, ती तब्बल एक-एक तास लेट होत असल्याने चाकरमान्यांचे हाल होत आहेत.

डेक्कन पुण्याहून निघण्यापासूनच तिचा तोरा होता. एक तर अनेक वर्षे ती पहिल्या क्रमांकाच्या फलाटावरूनच सुटत होती. त्यामुळे पुणे स्टेशनला जाऊन गाडी पकडणे एकदम सोपे होते. मात्र, कालांतराने इतर गाड्या वाढल्याने ती पुढच्या फलाटावर ढकलली गेली. तसेच पुण्याहून निघाल्यानंतर लोणावळा, दादर आणि नंतर थेट व्ही.टी. मुंबईतल्या लोकलची गर्दी असली, तरी डेक्कनसाठी एक मार्ग मोकळा सोडला जाई. तथापि, गेल्या काही काळापासून डेक्कनचा हा रूबाब उतरला आहे. मुंबईतील लोकलच्या संख्येत गेल्या काही काळात वाढ होऊ लागल्याने आता ठाण्याजवळची लोकल पुढे जाऊ देण्यासाठी चक्क डेक्कनलाच लाल सिग्नल दाखवला जाऊ लागला आहे.

परिणामी, कार्यालयीन वेळेत मुंबई गाठण्यासाठी पहाटेच घर सोडणार्‍या अन् कशासाठी-पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी असे म्हणत पुणे-मुंबई अप-डाऊन करणार्‍या चाकरमान्या पुणेकरांना वेळ पाळणे मुश्कील होऊ लागले आहे. हा विलंब कधी पंधरा मिनिटे, तर कधी चक्क एक तास असा होऊ लागला आहे. कर्मचारी कार्यालयात उशिरा येत असल्याने त्यांना बॉसची रोजची बडबड हा रोजचाच प्रकार झाला आहे. सरकारी-खासगी कार्यालये, न्यायालये आदींमध्ये काम असणार्‍यांकडून या लेटबाबत नाराजी व्यक्त होत आहे तसेच याबाबत तातडीने मार्ग काढावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

डेक्कन क्वीन ही गाडी आमच्यासाठी खूप महत्त्वाची गाडी आहे. पावसामुळे आणि काही तांत्रिक कारणामुळे या गाडीला कधी-कधी उशीर होत आहे. मात्र, त्यात सुधारणा करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

– डॉ. रामदास भिसे,
जनसंपर्क अधिकारी, रेल्वे, पुणे विभाग

नाव मोठं लक्षण खोट म्हणजे रेल्वे. डेक्कन क्वीन ही भारतीय रेल्वेची जगातील पहिली डिलक्स ट्रेन आहे. तिचे नाव सर्वत्र पसरले आहे. मात्र,रेल्वेच्या गलथान कारभाराचा फटका या गाडीच्या प्रवाशांना बसत आहे. पूर्वी या गाडीच्या आवाजावरून प्रवासी आपल्या हातातील घड्याळ लावायचे. आता तिला सातत्याने उशीर होत आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल होत आहेत. जोपर्यंत लोकल जात नाही तोपर्यंत डेक्कन क्वीनला अडवून ठेवले जातेय. मुंबईवाल्यांनी मुख्य मार्गावर लोकल सोडू नये. डेक्कन क्वीनला वेळेत जाण्यासाठी तात्काळ मार्ग द्यावा.

हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप

दहा दिवसांत असा झाला उशीर

दिनांक – इतके मिनिटे झाला उशीर
1 ऑगस्ट 2023 – 12 मिनिटे
2 ऑगस्ट 2023 – 14 मिनिटे
3 ऑगस्ट 2023 – 14 मिनिटे
4 ऑगस्ट 2023 – 44 मिनिटे
5 ऑगस्ट 2023 – 52 मिनिटे
6 ऑगस्ट 2023 – 13 मिनिटे
7 ऑगस्ट 2023 – 14 मिनिटे
8 ऑगस्ट 2023 – 11 मिनिटे
9 ऑगस्ट 2023 – 14 मिनिटे
10 ऑगस्ट 2023 – 13 मिनिटे

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT