देहूरोड : पुढारी वृत्तसेवा
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारी 337 वा पालखी सोहळ्यासाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका, पालखी आणि चांदीच्या रथाला चांदीचा मुलामा (चकाकी) देण्याचे काम बुधवारी (दि. 8) करण्यात आले. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्यावतीने सालाबादाप्रमाणे पालखी आणि रथाला चकाकी देण्यात येत आहे.
सोहळ्यात असणारी आभुषणे, अब्दागिरी, चौपदाराचे दंड, गरूडटक्के, समया, तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मुख्य मंदिरातील महीरप, मेघडंबरी, शेषनाग, मखर, चौकट, दरवाजे , 'श्रीं' चे चांदीची आभुषणे, पूजेची थाळी, तांब्याची समई, चौरंग, पाट,अभिषेकाचे पात्र यांची पिंपरी येथील घनशाम गोल्डच्या दहा कारागिरांच्या मदतीने चकाकी देण्याचे काम करण्यात येत आहे.
चकाकी देण्यासाठी लिंबाचा रस, चिंच मिश्रीत पाणी, रिठा आणि काही रसायनांचा वापर करीत स्वयंचलित तांब्याच्या तारा असलेला ब्रश, तारेचा ब्रश, दोन यांत्रिकी ब्रश, कापड आदी साहित्यांचा वापर करण्यात येत आहे. यासाठी घनश्याम गोल्डचे कुशल वर्मा यांच्या देखरेखीत सुनील दिक्षित, कमर अत्तार यासह दहा कर्मचारी सेवाभावाने चकाकी देण्याचे काम करत आहे.
हेही वाचा