पुणे

पिंपरी : शिवसेनेचे ओझे राष्ट्रवादी खांद्यावर घेणार का?

अमृता चौगुले

पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच पिंपरी- चिंचवडचा दौरा केला. या वेळी महापालिका निवडणुकीत मित्रपक्षांनी ताकदीपेक्षा जास्त जागा मागितल्यास 'एकला चलो रे'ची भूमिका घ्यावी लागेल, असा दम त्यांनी भरल्याने आघाडीबाबत साशंकता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीची ताकद, इच्छुकांची मोठी संख्या, आघाडी झाल्यास अनेक ठिकाणी बंडाची शक्यता लक्षात घेता शिवसेनेचे ओझे खांद्यावर घेणे राष्ट्रवादीला परवडणार का, असा प्रश्न आहे.

महापालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला बेसावध ठेवून राष्ट्रवादीने ऐनवेळी तोंडावर पाडले. त्यावेळी स्वतंत्र लढत राष्ट्रवादीने 36 जागांवर विजय मिळवला.काँग्रेसच्या हाती भोपळा आला. या वेळी राज्यात मुख्यमंत्री असलेल्या शिवसेनेची राष्ट्रवादीचे नेते अजित पवार तशीच गत करणार नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राष्ट्रवादीची महापालिका निवडणुकीसाठी चाललेली जोरदार तयारी पाहता राष्ट्रवादीला शिवसेनेचे ओझे पेलणार का, असा प्रश्न आहे.

चार महिन्यांपूर्वी महापालिका निवडणुकीत शिवसेनेला बरोबर घेण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. त्यामुळे शिवसेना पदाधिकार्‍यांत निर्धास्तपणा आला. राष्ट्रवादीने निवडणुकीच्या तोंडावर संघटनात्मक बदल केले. अजित पवारांचा झंझावाती दौराही झाला, परंतु, शिवसेना शांतच होती.

पालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने 50 नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे. महापौर शिवसेनेचाच होईल. 55 आमदारांमध्ये आमचा मुख्यमंत्री होऊ शकतो, मग पन्नास नगरसेवकांमध्ये महापौर का नाही होणार, असा प्रश्न शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भोसरी मेळाव्यात केला होता. मात्र, 50 जागा जिंकण्याची शिवसेनेची तयारी दिसून येत नाही.

पालिका बरखास्त होण्याआधी सत्ताधारी नगरसेवकच पालिकेतील चुकीच्या कामांविरोधात आवाज उठवताना दिसले. परंतु, शिवसेनेची मानसिकता दिसली नाही. निवडणुकीच्या तोंडावर केलेला जनजागृती रथ, ग क्षेत्रीय कार्यालय बैठकीत शहरप्रमुख सचिन भोसले यांनी प्रशासनावर निष्क्रीयतेचा आरोप करत गोट्या फेकून वेधलेले लक्ष हेच गेल्या काही दिवसातले भरीव काम. त्यामुळे निवडणुकीत शिवसेनेला मोठे यश मिळणे अवघड आहे.

राष्ट्रवादीने संघटनात्मक बदल करून पक्ष कार्यास वेग दिला आहे. तीन विधानसभा मतदारसंघासाठी तीन स्वतंत्र कार्याध्यक्षांची नियुक्ती केली आहे. प्रवक्ता नेमण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे झंझावाती दौरे सुरू आहेत. त्यामुळे शिवसेनेचे ओझे राष्ट्रवादी काँग्रेस खांद्यावर घेणार का हा प्रश्न आहे.

जागा वाटप हा कळीचा मुद्दा
महाविकास आघाडी होणार का? आघाडी झाल्यास मागील निवडणूक निकालाप्रमाणे विजयी झालेल्या जागा व दुसर्‍या क्रमांकाची मते हा निकष जागा वाटपासाठी ठरल्यास राष्ट्रवादी 94 जागांवर दावा करू शकते. अर्थातच जागा वाटप हा कळीचा मुद्दा ठरू शकतो. 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने 124 जागा लढवल्या व 36 जिंकल्या 58 ठिकाणी पक्षाच्या उमेदवारांनी दुसर्‍या क्रमांकाची मते घेतली. शिवसेनेने 119 जागा लढवल्या. 9 जिंकल्या व 26 ठिकाणी पक्षाचे उमेदवार दुसर्‍या क्रमांकावर होते. काँग्रेसने 59 जागा लढवल्या. मात्र, एकाही जागेवर विजय मिळाला नाही. परंतु, चार ठिकाणी पक्षाचे उमेदवार दुसर्‍या क्रमांकावर होते. अजित पवार काँग्रेसला खिजगणतीतही धरत नाहीत. एकूण राष्ट्रवादीची तयारी पाहता अजित पवार हे शिवसेनेलाही वार्‍यावर सोडणार नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

50 जागा देणे अवघड
निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना पालिकेत भाजपने केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात जनजागृती करणार आहे. नुकतेच पत्रकार परिषदेत तसे सांगण्यात आले. या वेळी शिवसेनेने महाविकास आघाडीत आम्हाला 50 जागा द्या अशी मागणी केली. मात्र, इतक्या जागा सोडायला राष्ट्रवादी तयार होईल, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT