सोलापूर : बांधकामांना रेनहार्वेस्टिंग बंधनकारक | पुढारी

सोलापूर : बांधकामांना रेनहार्वेस्टिंग बंधनकारक

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा सध्या पाण्याचा विषय कठीण हेात चालला आहे. त्यामुळे पावसाचा प्रत्येक थेंब वाचविणे आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. यापुढे शासनाच्या विविध विभागांमार्फत होणार्‍या नव्या इमारतींच्या बांधकामाना रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकाकरक करण्याची गरज असल्याचे मत जलशक्ती अभियान पथकातील सदस्यांनी मांडले. जिल्ह्यात नव्याने बांधण्यात येणार्‍या शाळांच्या इमारतीलाही हाच नियम असावा असे पथकातील सदस्यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना सूचित केले.

जलशक्ती अभियान ‘कॅच द रेन’ या उपक्रमात सोलापूर जिल्ह्यातील कामांचा आढावा आणि पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक गुरुवारपासून (दि. 16) 19 जूनपर्यंत चार दिवस सोलापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले आहे. नियोजन भवन येथे पथकाला जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जिल्ह्यातील कामांची माहिती दिली. दिल्ली येथील केंद्रीय उच्च शिक्षण विभागाचे संचालक प्रशांत अग्रवाल, पुणे येथील केंद्रीय जल, भूमी व संशोधन संस्थचे वैज्ञानिक भूषण तायडे या दोन तज्ञ सदस्यांच्या पथकानेजिल्ह्यातील विविध विभागाद्वारे जलशक्ती अभियानाअंतर्गत करण्यात आलेल्या विविधकामांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी अण्णासाहेब कदम, रोहयोच्या उपजिल्हाधिकारी चारूशिला देशमुख, कृषी उपसंचालक मोरे यांच्यासह जिल्हा भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

आढावा बैठकीत जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जलशक्ती अभियानांतर्गत जिल्ह्यातील कामांचे सादरीकरण केले. मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाझर तलाव दुरूस्ती, कोल्हापूर पद्धतीचे बंधारा दुरूस्ती कामाबाबतची माहिती देण्यात आली. जलशक्ती अभियान मोहिमेअंतर्गत शाळा व महाविद्यालयस्तरावर जनजागृती करण्यात आल्याची माहिती, जिल्ह्यातील पाणी स्त्रोत, साखर कारखाने, पिके यांचीही माहिती त्यांनी दिली. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतूनविविध करण्यात येणार्‍या कामांची माहिती श्रीमती देशमुख यांनी दिली.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बांधण्यात येणार्‍या इमारतीखाली पावसाचे पाणी साठवण करण्यात येत आहे. शाळांच्या इमारतीखालीही पाणी साठवण करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. अग्रवाल जिल्ह्याच्या कामाने भारावून गेले. पाऊस सुरू होण्यापूर्वी 2019 पासून जलशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पाण्याच्या स्त्रोताचे जीओ टॅगिंग करा असे त्यांनी सांगितले. वृक्ष लागवडव भूजल पातळी वाढविण्याच्या दृष्टीने रिचार्ज स्ट्रक्चर, विहीर पुनर्भरण इत्यादी कामे हाती घेऊन जलशक्ती अभियान ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे कदम यांनी सांगितले.

आज, उद्याचा कार्यक्रम

केंद्रीय पथक उद्या (दि.17) सोलापूर शहरातील पासपोर्ट ऑफिस, उर्दू शाळा क्र.1 याठिकाणी राबविण्यात आलेल्या रेन वॉटर हार्वेस्टिंग, वन विभागाने राबविलेल्या मियावाकी वृक्षारोपन तसेच दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील विविध जलसंधारण कामांना भेटी देणार आहे. शनिवारी (दि. 18) मंगळवेढा तालुक्यातील येळगी व पौट व सांगोला तालुक्यातील विविध जलसंधारण कामांना भेटी देणार असल्याचे सांगण्यात आले.

Back to top button