लोणी-धामणी : पुढारी वृत्तसेवा: मुगाच्या पिकाचे आगर असलेल्या आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागाला अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. मृगाच्या पावसाने आठ दिवसांपूर्वी हजेरी लावली. पण, त्यानंतर पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतीची कामे मात्र ठप्प झाली आहेत. परिणामी, मुगाची पेरणी लांबणीवर पडणार आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वडगावपीर, मांदळेवाडी, धामणी, लोणी, पहाडदरा येथे मुगाचे; तर शिरदाळे येथे बटाट्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तसेच बाजरी व भुईमुगाचे देखील पीक घेतले जाते. मात्र, ते प्रमाण कमी असते. मागील दोन वर्षे हमखास पैसे मिळवून देणारे पीक असलेल्या मुगाला बाजारभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
सध्या तर पावसाने दडी मारल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. हे मृग नक्षत्र अजून तीन दिवस आहे. बुधवारी (दि. 22) मृग नक्षत्र बदलत आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत जर पाऊस पडला, तर मशागतीच्या कामांना वेग येणार आहे.
मृग नक्षत्रात या भागात पावसाने हजेरी लावली. मात्र, त्यानंतर पाऊस पडला नाही.
म्हणजेच, या नक्षत्रात एखादाच पाऊस पडला आहे. बुधवारपासून आर्द्रा नक्षत्र लागत आहे. या नक्षत्रात पाऊस पडला तर चांगला पडतो; अन्यथा या नक्षत्रात पाऊस दांडी मारतो. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. सध्यातरी पाऊस न पडल्याने अजूनही पिण्यासाठी पाण्याचे टँकर परिसरात सुरू आहेत.
हेही वाचा