

पणजी, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील शिक्षण क्षेत्रात डिजिटल क्रांती घडविण्याचे उद्दिष्ट सरकारने समोर ठेवले असून, त्या अनुषंगाने शिक्षण क्षेत्रात विविध बदल घडवले जात आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
शनिवारी राज्यस्तरीय क्रांतिदिन सोहळ्यात पणजी येथील आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारकाला अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, सभापती रमेश तवडकर, पर्यटनमंत्री रोहण खंवटे, आमदार रुडाल्फ फर्नांडिस, गोवा- दमन दीव स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष जोकिम पिंटो आदी उपस्थित होते.
राज्य सरकारने रोबोटिक व कोडिंग पद्धतीच्या शिक्षणाला सुरुवात केली आहे. सरकार शिक्षण क्षेत्रात सातत्याने चांगले बदल घडवत असून, डिजिटल क्रांतीसाठी प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
शिक्षण क्षेत्रात डिजिटल क्रांती घडविण्यासाठी सरकारला पालक शिक्षकांचे सहकार्य आवश्यक आहे. गोवा मुक्तीची 60 वर्षे पूर्ण झाली आहेत. मुक्तीनंतर गोवा विकासाच्या दिशेने वाटचाल करत असतानाच विकासाचे भागीदार आणि साक्षीदार लोकांनी व्हावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. अभ्यासक्रमात गोवा मुक्ती लढ्याचा, गोव्याच्या इतिहासाचा समावेश व्हावा, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आग्वाद कारागृहांचे नूतनीकरण केले गेेले आहे. पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारक, मडगाव येथील लोहिया मैदानाचे नूतनीकरण पूर्णत्वाकडे आहे. ही ऐतिहासिक स्थळे जतन करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
राम मनोहर लोहिया हे राष्ट्रवादी विचाराचे नेते होते. त्यांनी
गोव्यात मुक्तीची ज्योत पेटवली. त्यानंतर गोव्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या संघर्षाच्या, हौतात्म्याच्या बळावर गोवा मुक्त झाला, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी यावेळी अनेक स्वातंत्र्यसैनिकांचा उल्लेख करत त्यांच्या कार्याला अभिवादन केले.
नकारात्मक दृष्टिकोन हा नेहमीच धोकादायक असून, अशा गोष्टींना कोठेही थारा असू नये. गोवा मुक्तीचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. त्यादिशेने पावले उचलण्याची गरज असल्याचे मत राज्यपाल पिल्लई यांनी यावेळी व्यक्त केले.
सुखी व आनंदी गोवा निर्माण होणे गरजेचे असून, त्यासाठी सरकारला जनतेची साथ हवी. कुणावर अन्याय होत असल्यास त्यांनी निश्चितच आवाज उठवावा, राजकीय पक्ष असो किंवा विरोधी पक्ष असो, अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचा अधिकार प्रत्येकाला असल्याचे राज्यपाल म्हणाले.