सातारा : बोगस वाळू पावत्या छापण्याचे रॅकेट

सातारा : बोगस वाळू पावत्या छापण्याचे रॅकेट
Published on
Updated on

सातारा; पुढारी वृत्तसेवा : जिहे-कठापूर योजनेचे टेंडर रद्द करण्याचे पाप माण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केले आहे. त्यासाठी शिष्टमंडळ जलसंपदामंत्र्यांनाही भेटले होते. टेंभू योजनेतून माण-खटावला पाणी मिळावे, यासाठी मी केलेल्या प्रयत्नांना यश आले. मात्र, कृतज्ञता सोहळा घेणार्‍यांचे टेंभू योजनेसाठी योगदान काय, असा सवाल आ. जयकुमार गोरे यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. माणमध्ये बोगस वाळू पावत्या छापण्याचे रॅकेटही कार्यरत असून येत्या अधिवेशनात सखोल चौकशीची मागणी करणार असल्याचे आ. गोरे यांनी सांगितले.

आ. गोरे म्हणाले, माण तालुक्यात वाळू तस्करांच्या, गुंडांच्या व दरोडेखोरांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. कारवाई केल्यास वाळू ठेकेदार तलाठ्याला दम देतात. हप्तेखोरीसंदर्भातील रेकॉर्डिंग अधिवेशनात सादर केले होते. माण तहसीलदार निलंबित झाले. मतदारसंघात नसताना तातडीने वाळूची 4 टेंडर निघाली. नियमबाह्य पध्दतीने वाळू उपसा केला. 400-500 डंपर वाळू उपसा दररोज केला जात होता. वाळू ठेकेदारांच्या उच्छादाने नदीकाठचे लोक वैतागले होते. ठेके द्यायची कल्पना तालुक्यातील महान नेत्यांची होती. आयुक्त असल्यामुळे त्यांना सर्व गोष्टींची कल्पना होती. ठेके कसे काढायचे, मंजूर कसे करुन घ्यायचे, कुठून द्यायचे, बगलबच्च्यांना कसे द्यायचे, कारवाई कशी थांबवायची याचे नॉलेज त्यांना पूर्वीपासूनच होते. वाळू पावत्या छापायचे टेंडर तालुक्यातील एकाकडे आहे. ज्याच्याकडे आहे तो कुणाचा माणूस आहे? करोडो रुपयांचे हे रॅकेट आहे. या सॉफ्टवेअरवर किती पावत्या छापतात आणि कसं काढतात? छावणीत जिओ टॅगिंग करुन हप्ते घेतले होते. कुक्कुडवाड गटात फिरत असलेला माल कुठल्या टॅगिंगचा आहे, हे मला माहित आहे. हा विषय अधिवेशनात होईल. जलसंपदाचे सचिव असताना माण नदीचे संवर्धन करायचे काम यांनी हाती घेतले होते. नदी व वाळू जपा, असे जलतज्ज्ञांनी सांगितले. पण या महाशयांनी वाळूचे ठेके काढायला सांगून ते बगलबच्च्यांना दिले. हप्तेखोरीमुळे महसूल अधिकार्‍यांकडे तक्रार करुनही कारवाईचे धाडस दाखविले नाही. स्थानिक प्रशासनावर तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते दबाव आणत आहेत. बगलबच्च्यांना पैसे मिळवून देऊन त्याच्यावर निवडणुका करायच्या असे नियोजन आहे. ही कारवाई थांबविण्यासाठी प्रचंड काथ्याकूट केला. कारवाईतील वाहने कमी दाखविण्यासाठी अधिकार्‍यांवर दबाव आणले. त्यातच ही कारवाई खर्‍या वाळूतस्करावर न करता पंटरवर गुन्हे दाखल झाले आहेत. शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवून गुंडगिरी केली. जिल्हाधिकारी व एसपींना भेटणार आहे. येत्या अधिवेशनात हा विषय मांडून निकाली कुस्ती करणार आहे. वेळ पडल्यास हक्कभंग आणणार आहे, असेही आ. जयकुमार गोरे यांनी सांगितले.

आ. गोरे म्हणाले, माण, खटाव आणि आटपाडी तालुक्यासाठी टेंभूचे 8 टीएमसी पाणी आरक्षित केल्याची चर्चा आहे. 50 वर्षांपासून हे पाणी या तालुक्यांना देणे अपेक्षित होते. त्यावेळी कुठल्याही पक्षाने कृतज्ञता सोहळा दाखवायला एवढी तत्परता दाखविली नव्हती. एक-दीड महिन्यांपूर्वी पाण्याचे आरक्षण झाले. त्यानंतर तातडीने अंमलबजावणी, त्याची सुधारित मान्यता, प्रशासकीय मान्यता, टेंडर मंजूर किंवा कुठलेही काम झाले नाही. मात्र, कृतज्ञता सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला. सनदी अधिकारी असताना 30 वर्षांच्या काळात त्यांच्या तोंडी टेंभू, जिहे-कठापूर, उरमोडी हे शब्द आले नाहीत, असा माणूस कृतज्ञता सोहळा घ्यायला पुढे आला. सोहळा घ्यायला हरकत नाही पण या योजनांमध्ये त्यांचा सहभाग काय? अशा व्यक्तींना सोहळा घ्यायचा अधिकार नाही. माझ्यावर बोलण्याचाही अधिकार नाही, असेही ते म्हणाले.

आ. गोरे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कालावधीत आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे या योजनेला गती आली. या पाण्यासाठी आम्ही प्रचंड प्रयत्न केले. शिवाय येळगावकर, अनिल देसाई यांनीही त्यांच्या परीने प्रयत्न केले. फायदा, तोटा बाजूला ठेवा पण ते प्रयत्नशील होते. पण आता वाजंत्रीच नवरेदव झाल्यावर करायचं काय? असा सवाल त्यांनी केला. सरकारचा वापर करुन माझ्यावर काय कारवाया करायचे आहेत त्या करा. आमच्यावर पोलिस कारवाईसाठी किंवा गुन्हे दाखल होण्यासाठी जेवढी ताकद लावता तेवढीच ताकद माण-खटावमधील एखादा तरी प्रश्न सुटावा यासाठी लावा, असा सल्ला त्यांनी दिला.

आ. गोरे म्हणाले, जिहे-कठापूर योजना पूर्ण करणे हा दुसरा टप्पा होता. या योजनेची पहिली लाईन पूर्ण झाली असून नेर तलावात पाणी पोहोचले आहे. ही योजना मी मंजूर करुन आणली म्हणून टेंडर प्रक्रिया रखडवून ठेवण्याचे पाप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व तालुक्यातील नेत्यांनी केले. माझा राजकीय पराभव करण्यासाठी क्लृप्त्या करा, केसेस घाला पण योजनेत राजकारण आणू नका. योजनेचे टेंडर तातडीने काढावे, अशी भूमिका घ्यावी. जिहे-कठापूर येाजनेचे टेंडर काढण्यासाठी विधानसभा अधिवेशनात लक्षवेधी केली होती. त्यावेळी गोलगोल उत्तरे देण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. जयंत पाटील यांनी महिन्यात योजनेचे टेंडर काढले जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर टेंडरही निघाले. पण 32 गावांना पाणी दिल्याचे श्रेय मला मिळेल म्हणून तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ जयंत पाटील यांना भेटले आणि झालेले टेंडर रद्द करण्यात आले. अशा क्वॉलिटीचे राजकारणी माणच्या मातीत जन्माला आलेत. देवाने देशमुखांना सुबुध्दी द्यावी आणि येणार्‍या विधानसभा निवडणुकीपर्यंत ते व्यवस्थित असावेत, माझे प्रतिस्पर्धी म्हणून असावेत अशी मनापासून इच्छा आहे, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले. रामराजेंकडे पंधरा वर्षे जलसंपदा खाते होते. त्यांच्या नाकर्तेपणामुळे आणि निष्क्रियतेमुळेच माण-खटावला पाणी आलं नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

विकासकामं सुरु असताना लोकप्रतिनिधी खंडणी मागत असल्याचे अजित पवार म्हटले होते. त्यांचा रोष कुणावर होता? असे विचारले असता आ. गोरे म्हणाले, त्यांचा रोष माझ्यावर नव्हता. माण-खटावमधील कुठंली काम थांबविण्याची आपली भूमिका नाही. त्यामुळे अजितदादा माझ्यावर असे आरोप करणारच नाहीत. त्यांच्या निदर्शनास काहीजण आले असतील म्हणून त्यांनी आरोप केले असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

खटल्यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, हा विषय न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणात जामीन होईल किंवा न होईल की आणखी काय होईल सांगू शकत नाही. सर्व परिस्थितीला सामोरे जाणार आहे. कायद्यापेक्षा मी मोठा नाही. कायद्याने जे होईल, जो निर्णय होईल तो मान्य असेल. संधी असेल तिथे न्याय मागणार आहे. न्याय न मिळाल्यास तिथून पुढील प्रक्रियेला सामोरे जाईन. उच्च न्यायालयात जाण्यासाठी 15 दिवसांचे प्रोटेक्शन आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news