पुणे : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसांच्या प्रचार दौर्याने उद्यापासून पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. पंतप्रधान मोदी यांची पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा सोमवारी (दि. 29) सायंकाळी साडेपाच वाजता रेसकोर्स मैदानावर होणार आहे. या सभेनंतर त्यांचा मुक्काम पुण्यातील राजभवनात राहणार आहे.
पुण्यातील सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. सभेसाठी सुमारे दोन लाख लोक येतील, असा अंदाज बांधून नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी स्वतंत्र वाहनतळाच्या जागा निश्चित केल्या आहेत. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मोदी हेलिकॉप्टरमधून थेट सभास्थानी येणार आहेत. सभा संपल्यानंतर मोदी हे राजभवनात मुक्कामासाठी जातील. तेथे मंगळवार सकाळपर्यंत ते थांबणार असून, तेथून सकाळी अकराच्या सुमाराला ते माळशिरसकडे रवाना होतील. दरम्यान, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांच्या सोमवारी पुण्यासह सोलापूर, कराड येथे तर मंगळवारी माळशिरस, धाराशिव आणि लातूर येथे सभा होणार आहेत, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली.
सोमवार 29 एप्रिल : होम मैदान, सोलापूर, दुपारी दीड. (उमेदवार : राम सातपुते). कराड : दुपारी 3.35 वा. (उदयनराजे भोसले ). पुणे : रेसकोर्स मैदान, संध्या 5.45 वा. (मुरलीधर मोहोळ, श्रीरंग बारणे, सुनेत्रा पवार आणि शिवाजीराव आढळराव पाटील).
मंगळवार, 30 एप्रिल : माळशिरस, स. 11.45 वा. (रणजितसिंह नाईक निंबाळकर). धाराशिव : दुपारी दीड (अर्चना पाटील). लातूर : दुपारी 3 वा. (सुधाकर शृंगारे)
हेही वाचा