पुणे, पुढारी वृत्तसेवा: पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात वीजयंत्रणा धोकादायक असल्याचे आढळल्यास त्याची माहिती नागरिकांनी व्हॉट्सअॅपद्वारे द्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. पुणे परिमंडलअंतर्गत पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासह हवेली तालुका तसेच मुळशी, वेल्हे, मावळ, खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्यांसाठी 7875767123 तसेच बारामती मंडलअंतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर,
भोर व पुरंदर या तालुक्यांसाठी 7875768074 हा व्हॉट्सअॅप मोबाईल क्रमांक महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर फक्त महावितरणच्या वीजवितरण यंत्रणेपासून सुरक्षेचा धोका असल्यास त्याचा फोटो व संपूर्ण पत्ता किंवा लोकेशनसह माहिती, तक्रारी स्वीकारण्यात येत आहेत. नागरिकांनी या क्रमांकावर कॉल करण्याऐवजी फक्त धोकादायक वीजयंत्रणेची माहिती व्हॉट्सअॅपद्वारे द्यावी. तसेच ज्या नागरिकांकडे व्हॉट्सअॅप नाही त्यांनी ङ्गएसएमएसफद्वारे या मोबाईल क्रमांकावर माहिती दिल्यास त्याचेही निराकरण करण्यात येणार आहे.
महावितरणची वीजतार तुटलेली आहे किंवा जमिनीवर लोंबळकत आहे. फ्यूजपेट्या किंवा फीडर पिलरची झाकणे उघडी किंवा तुटलेली आहेत. रोहित्रांचे कुंपण उघडे आहे. भूमिगत वाहिनी उघड्यावर आहे, मुसळधार व संततधार पावसामुळे माती वाहून गेल्याने किंवा अन्य कारणांमुळे वीजयंत्रणेला धोका निर्माण झाला आहे इत्यादी स्वरूपाची माहिती आणि तक्रारी छायाचित्रांसोबत संबंधित स्थळाच्या संपूर्ण पत्त्याचा उल्लेख करून किंवा लोकेशनसह महावितरणच्या व्हॉट्सअॅप मोबाईल क्रमांकावर पाठवता येत आहे. यासोबतच महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर देखील संपर्क साधून धोकादायक यंत्रणेची माहिती देण्याची सेवा उपलब्ध आहे.
हेही वाचा