पुणे, पुढारी वृत्तसेवा: 'शहराला पाणीपुरवठा करणार्या खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांतील पाणीसाठा तेरा टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. मात्र हा साठा किमान दोन महिने पुरू शकतो, 'अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली आहे. पुणे शहराला खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. या धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या आवर्तनासाठी कालव्याद्वारे सोडण्यात आलेले पाणी 20 जून रोजी बंद केले जाणार आहे.
22 मे रोजी या धरणसाखळीत एकूण पाणीसाठा चौतीस टक्के म्हणजे 9.11 टीएमसी इतका होता. तो या महिन्यात कमी झाला असून, सध्या या चारही धरणांत एकूण 3.81 टीएमसी पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी हेच प्रमाण 6.62 टीएमसी म्हणजे 22.72 टक्के इतके होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निम्माच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गेल्या आठवड्यात पुण्यात पावसाचे आगमन झाले. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही पावसाची दमदार हजेरी नाही.
पुढील काळात पावसाने आणखी ओढ दिली तर पुण्याच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. पावसाने ओढ दिली तर शहराला केल्या जाणार्या पाणी पुरवठ्यात कपात केली जाऊ शकते, तसेच एक दिवसा आड पाणीपुरवठा करण्याचा निर्णयही प्रशासनाकडून घेतला जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर बोलताना पावसकर म्हणाले, 'आवर्तनासाठी कालव्याद्वारे सोडण्यात आलेले पाणी 20 जून रोजी बंद करण्यात येणार आहे. हे आवर्तन बंद केल्यानंतरही धरणात तीन ते साडेतीन टीएमसी पाणी शिल्लक राहणार आहे. हे पाणी शहराला दोन महिने पुरेल.'
हेही वाचा