

हिंगोली : अवेळी पडत असलेला पाऊस, त्यामुळे सततची नापिकी आणि त्यातून शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे. त्यामुळे एका शेतकर्याने नामी शक्कल लढवून शेती व्यवसाय सोडून हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हेलिकॉप्टर भाड्याने दिल्यास प्रतितास 65 हजार रुपये मिळतात, असा दावा करून या शेतकर्याने बँकेकडे हेलिकॉप्टर खरेदीसाठी चक्क 6 कोटी 65 लाख रुपयांच्या कर्जाची मागणी केली आहे. या मागणीने बँक अधिकारीही अवाक् झाले.
कैलास पतंगे असे या शेतकर्याचे नाव आहे. ते हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील अल्पभूधारक आहेत. शेती सोडून आपणही दुसरा व्यवसाय करावा, अशी मनोमनी इच्छा पतंगे यांनी व्यक्त केली. त्यांनी बुधवारी जिल्ह्यातील गोरेगाव येथील बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी प्रसाद काळे यांची भेट घेतली. त्यानंतर हेलिकॉप्टर खरेदीसाठी काळे यांच्याकडे 6 कोटी 65 लाख रुपयांचे कर्ज द्या, अशी मागणी अर्जाद्वारे केली. विशेष म्हणजे पतंगे यांनी कर्जमागणीचा रीतसर अर्ज शाखाधिकार्यांच्या हातात दिला.
पतंगे यांच्याकडे दोन एकर जमीन असून शेती परवडत नसल्याचे कारण सांगत हेलिकॉप्टर खरेदी करावी, असे वाटत असल्याचे त्यांनी काळे यांना सांगितले. एरवी बँकांकडून पीककर्जासाठी शेतकर्यांची अडवणूक होत असताना पतंगे यांनी चक्क साडेसहा कोटींचे कर्ज मागितले. तेही हेलिकॉप्टर खरेदीसाठी. त्यामुळे शाखाधिकारी काळे हे पतंगे यांच्या चेहर्याकडेच पाहातच राहिले. पतंगे यांच्याकडे असलेल्या दोन एकर शेतीतून उदरनिर्वाह होत नसल्याने त्यांनी हेलिकॉप्टर खरेदीचा निर्धार केला आहे. वेळ आल्यास शेती विकण्याचा निर्णयसुद्धा त्यांनी घेतला आहे.