पुणे

चुकीचे मीटर रीडिंग भोवले; वीजबिलाच्या कामातील हयगयीवरून राज्यातील 47 एजन्सीज बडतर्फ

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: हेतुपुरस्सर चुका व अचूक रीडिंगमध्ये हयगय केल्याचे आढळून आल्याने राज्यातील तब्बल 47 मीटर रीडिंग एजन्सीजना बडतर्फ करण्यात आले असून, त्यातील 8 एजन्सीजना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. लघुदाब वर्गवारीतील सुमारे 2 कोटी 15 लाख ग्राहकांना अचूक बिल देण्यासाठी महावितरणने फेब्रुवारीपासून विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. या धडक उपाययोजनांमुळे मीटर रीडिंगच्या बाबतीत ग्राहकांच्या तक्रारींमध्ये मोठी घट झाली असून, महावितरणच्या महसुलात देखील वाढ झाली आहे.
वीजगळती कमी करण्यासोबतच ग्राहकहिताच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करीत महावितरणने ग्राहकाभिमुख सेवेच्या सुधारणांना मोठा वेग दिला आहे. यात अतिशय महत्त्वाच्या बिलिंगसाठी वीजमीटरच्या अचूक रीडिंगला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. याबाबतीत आढावा घेताना 100 टक्के अचूक मीटर रीडिंग अपेक्षित असताना त्यात हयगय होत असल्याचे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना आढळून आले.

या प्रकाराची त्यांनी गंभीर दखल घेतली व प्रथमच राज्यातील थेट सर्व मीटर रीडिंग एजन्सीजचे संचालक तसेच क्षेत्रीय उपविभाग कार्यालयांचे प्रमुख व लेखा अधिकारी यांची व्हीसीद्वारे आढावा बैठक घेतली होती. 'कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक वीजमीटरचे रीडिंग 100 टक्के अचूक झालेच पाहिजे. चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना होणारा मनस्ताप व बिल दुरुस्तीचा त्रास तसेच महावितरणच्या महसुलाचे नुकसान अजिबात सहन केले जाणार नाही. मीटरचे अचूक रीडिंग घेण्यात हयगय करणार्‍या एजन्सीजविरुद्ध कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले होते.

त्याप्रमाणे गेल्या फेब्रुवारीपासून मुख्यालय व क्षेत्रीय कार्यालयांनी एकत्रितपणे पर्यवेक्षणातून मीटरच्या अचूक रीडिंगसाठी धडक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. महावितरणच्या सुमारे 2 कोटी 15 लाख लघुदाब ग्राहकांकडील मीटरचे रीडिंग कंत्राटी पद्धतीच्या एजन्सींद्वारे करण्यात येते. या एजन्सींनी काढलेल्या मीटर रीडिंगच्या फोटोची खातरजमा व पडताळणी करण्यासाठी मुख्यालयात यापूर्वीच स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

या कक्षाने केलेल्या पडताळणीमध्ये मीटर रीडिंगचे फोटो अस्पष्ट असणे, फोटो व प्रत्यक्ष रीडिंगमध्ये तफावत असणे तसेच रीडिंग न घेता आल्याचा हेतुपुरस्सर शेरा देणे आदी प्रकार आढळून येत आहेत. त्याप्रमाणे संबंधित रीडिंग एजन्सीच्या कामामध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू आहे, परंतु हयगय कायम राहिल्यास एजन्सीजविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे.

गेल्या चार महिन्यांमध्ये मीटर रीडिंगच्या कामामध्ये हयगय करणार्‍या तब्बल 47 मीटर रीडिंग एजन्सींना बडतर्फ करण्यात आले आहे. यामध्ये नांदेड परिमंडलातील 10, जळगाव- 8, अकोला- 7, लातूर, कल्याण, बारामती व नाशिक- प्रत्येकी 4, औरंगाबाद- 2, तसेच पुणे, चंद्रपूर, कोकण व अमरावती या परिमंडलातील प्रत्येकी एका एजन्सीचा समावेश आहे. यातील 8 एजन्सीजना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.

मीटर रीडिंगमध्ये लक्षणीय सुधारणा

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल हे दर पंधरवड्याला प्रामुख्याने अचूक मीटर रीडिंगसंदर्भात आढावा घेत आहेत. मुख्यालयासोबतच क्षेत्रीय स्तरावरील विविध उपाययोजना तसेच कामात कुचराई करणार्‍या एजन्सीजविरुद्ध सुरू असलेली कारवाई, यामुळे मीटर रीडिंगमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. ग्राहकांना रीडिंगनुसार वीजवापराचे योग्य वीजबिल मिळत असल्याने त्यांच्या तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे. सोबतच गेल्या एक महिन्यात वीजविक्रीमध्ये 199 दशलक्ष युनिटने वाढ झाल्याचे दिसत असून, महावितरणच्या महसूलात 140 कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT