पिंपरी : पालखी स्वागतासाठी यंदाही मंडपास परवानगी नाही

पिंपरी : पालखी स्वागतासाठी यंदाही मंडपास परवानगी नाही

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा:  जगद्गुरू संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांच्या स्वागतासाठी व खाद्यपदार्थ वाटपासाठी मंडप उभारण्यास यंदाही महापालिका व पोलिसांकडून परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे माजी नगरसेवक, इच्छुक व सामाजिक कार्यकर्ते नाराजी व्यक्त करीत आहेत.

जगद्गुरू संत तुकाराम महाराजाची पालखी शहरात निगडी येथे मंगळवारी (दि. 21) प्रवेश करणार आहे. त्या दिवशी आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्काम करून पालखी दुसर्‍या दिवशी बुधवारी (दि. 22) पुण्याच्या दिशेने रवाना होणार आहे. तर, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी बुधवारी आळंदी रस्ता येथून शहरातून जाणार आहे. दोन्ही ठिकाणी पालिकेच्यावतीने पालखी व दिंडीप्रमुखांचे स्वागत केले जाणार आहे. दिंडीप्रमुखांना कापडी पिशव्यांचे वितरण केले जाणार आहे.

कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे पायी आषाढी वारी काढण्यात आली नाही. त्यापूर्वीच्या वारीत स्वागत तसेच, खाद्यपदार्थ वाटपासाठी मंडप उभारण्यास महापालिका व पोलिसांनी बंदी घातली होती. महापालिकेच्या निवडणुका केव्हाही लागू शकतात.
त्यामुळे माजी नगरसेवकांसह इच्छुक व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये दांडगा उत्साह असून, पालखीच्या स्वागतासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे.

त्यांनी पालिका व क्षेत्रीय अधिकारी तसेच, पोलिसांकडे मंडप उभारणीस परवानगी देण्यासाठी अर्ज केले होते. त्यांना
परवानगी नाकारली जात आहे. या प्रकारामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. निगडी बस थांबा येथे दरवर्षी मंडप उभारून वारकर्यांना अन्नदान केले जाते. तसेच, औषध व उपचार सुविधा पुरविली जाते. मंडपास परवानगी दिली जात नसल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत, असे सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे.

logo
Pudhari News
pudhari.news