वेल्हे : पुढारी वृत्तसेवा: राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस पडत असताना खडकवासला धरणसाखळीवर मात्र यंदा मान्सूनचा पाऊस रुसला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दहा टक्केही पाऊस टेमघर, खडकवासला येथे पडला नाही. पानशेत, वरसगावमध्येही जवळपास अशीच स्थिती आहे. गेल्या पंधरा वर्षात प्रथमच जून महिन्यात पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे गुरुवारी (दि. 23) धरणसाखळीत केवळ 3.12 टीएमसी म्हणजे 10.70 टक्के पाणीसाठा उरला आहे. टेमघर कोरडेच असून पानशेत, वरसगाव, खडकवासलातील पाण्याची पातळी जेमतेम 12 टक्के इतकी आहे.
गेल्या वर्षी 1 ते 23 जूनपर्यंत खडकवासलात 200, पानशेत येथे 332, वरसगाव येथे 325 व टेमघर येथे 490 मिलिमीटर इतका पाऊस पडला होता. यंदा पावसाने पाठ फिरवल्याने या कालावधीत टेमघर येथे फक्त 25, तर खडकवासलात केवळ 10 मिलिमीटर इतका पाऊस पडला. वरसगाव येथे 50 व पानशेत येथे 55 मिलिमीटर पाऊस पडला. गुरुवारी दुपारी साडेतीन ते पाच वाजेपर्यंत मेघगर्जनेसह खडकवासला, सिंहगड, पानशेत भागात पावसाच्या सरी कोसळल्या. मात्र त्यानंतर पावसाने उघडीप घेतली.
दिवसभरात खडकवासलात 7, पानशेत येथे 9, वरसगाव येथे 5, टेमघर येथे 2 मिलिमीटर पाऊस पडला. जून महिना संपत आला तरी धरणक्षेत्रात पावसाचा लंपडाव सुरू आहे. गेल्या वर्षी दि. 10 जूनपासून मुसळधार पाऊस कोसळणार्या पानशेत, वरसगाव धरण क्षेत्रातील दापसरे, तव, शिरकोली, माणगाव, पोळे भागातही तुरळकच पाऊस पडत आहे. रायगड जिल्ह्यालगतच्या धरण क्षेत्रातील सह्याद्रीच्या डोंगरी पट्ट्यातही मान्सून सक्रिय झाला नसल्याचे चित्र आहे.
पानशेत, वरसगावमध्ये वेगाने घट
पानशेतमधून 443 व वरसगावमधून 548 क्युसेक वेगाने पाणी खडकवासला धरणात सोडले जात आहे. त्यानुसार खडकवासलातून पिण्यासाठी पाणी सोडले जात आहे. पावसाअभावी धरण साखळीतील चारपैकी एकाही धरणात पाण्याची आवक सुरू झाली नाही. उलट पुणे शहर व परिसरासाठी सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे धरण साठ्यात दर तासागणिक घट सुरू आहे. धरणांची बहुतांश पाणलोट क्षेत्रे उघडी पडली आहेत. खडकवासलातील मुठा नदीचे पात्र मांडवी-खानापूरदरम्यान दिसत आहे. पानशेतमधील आंबी नदीचे पात्र कोरडे दिसत आहे. अशीच स्थिती वरसगाव धरण क्षेत्रात आहे.
हेही वाचा