

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा कॅण्टोन्मेंट बोर्डाकडे हेस्कॉमचे पथदीपांचे थकीत वीज बील अडीच कोटींच्या घरात आहे. यासाठी एसएफसी अनुदानामधून कॅण्टोन्मेंटला 37 लाखांचे अनुदान मंजूर झाले आहे. कॅण्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील पथदीपांचा बीजपुरवठा बंद केल्यानंतर दीड महिना सर्व रस्त्यांवर अंधार पसरला होता. यादरम्यान राज्य शासनाकडे पाठपुरावा करून एसएफसी निधी मंजूर करण्याची विनंती करण्यात आली होती. अखेर या प्रयत्नांना यश आले असून पथदीपांच्या बिलापोटी 37 लाखांचे अनुदान मंजूर झाले आहे. ही बिलाची रक्कम यापुढे सातत्याने मिळणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
कॅण्टोन्मेंट बोर्डला केंद्र व राज्य शासनाकडून निधी दिला जात होता. मात्र 2011 पासून राज्य शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला नाही. केंद्र शासनानेदेखील वर्षांपासून निधी दिला नव्हता. परिणामी कॅण्टोन्मेंटची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. विद्युत बिल, पाणीपट्टी आणि कर्मचार्यांचे वेतन देण्यासाठीदेखील कॅण्टोन्मेंटकडे निधी उपलब्ध नाही. कॅण्टोन्मेंट परिसरातील पथदीपांच्या बिलाची रक्कम हेस्कॉमला अदा करण्यात आलेली नाही. त्यामुळे सुमारे अडिच कोटी रूपये बिल थकित आहे. सदर रक्कम भरण्यासाठी हेस्कॉमने कॅण्टोन्मेंटकडे तगादा लावला होता.
पण बिल भरले नसल्याने हेस्कॉमनेविद्युतपुरवठा खंडित केला होता. एसएफसी अनुदानाची रक्कम विद्युत बिल भरण्यासाठी वापरण्यात येत होती. पण 2011 पासून एसएफसी अनुदानाची रक्कम राज्य शासनाने दिली नसल्याने बिलाची रक्कम थकली होती. दरम्यान, एसएफसी अनुदान मंजूर करून घेण्यासाठी कॅण्टोन्मेंट बोर्डने राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. याला यश आले आहे.